
एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अखेर जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. आबिद अन्सारी असे त्याचे नाव आहे. गेले सहा महिने पोलीस त्याचा शोध घेत होते. अन्सारीच्या अटकेने १८ ते २० गुन्ह्यांची उकल करण्यात जे. जे. मार्ग पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार हे त्यांच्या मुलाच्या एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांची भेट अन्सारीशी झाली. कळवा येथील एका महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्याने तक्रारदारा कडून ४२ लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही तक्रारदाराच्या मुलाला प्रवेश मिळाला नव्हता. फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक रईस शेख यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आदींच्या पथकाने तपास सुरू केला. अन्सारीविरोधात राज्यात गेल्या १२ वर्षांपासून गुन्हे दाखल असल्याचे समजले. तोच धागा पकडून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.




























































