
मुंबईत नाही, तर किमान उपनगरात तरी आपले हक्काचे घर असावे असे अनेकांना वाटते. आपल्या आवाक्यात बसेल अशा किमतीत शुक्रवारी हजारो नागरिक घर घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच गरीब व गरजू नागरिकांना बँकेने जप्त केलेले फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका ठगाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-12 ने शोधून बेडय़ा ठोकल्या आहेत.
बँकेने जप्त केलेले फ्लॅट कमी किमतीत मिळवून देतो असे सांगत बनावट दस्ताऐवज बनवून एका भामटय़ाने अनेकांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, युनिट-12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विक्रमसिंग कदम, उपनिरीक्षक हेमंत गीते तसेच मंगेश तावडे, संतोष बने आदींच्या पथकाने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. त्यामुळे तावडे व त्यांच्या पथकाने खबऱ्यांचे जाळे पसरवून आरोपीचा शोध सुरू केला. नाशिक गाठून तेथे लपलेल्या आरोपी सचिनच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईत आणले.




























































