
पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ‘ऑपरेशन पाथर्डी’ सुरू केले आहे.
या शोधमोहिमेअंतर्गत राज्यातील अनुभवी व विशेष कौशल्य असलेल्या नेमबजांना पाचारण करण्यात आले आहे. वन विभागाच्या जिल्हास्तरीय मोहिमेचे केंद्र पाथर्डी झाले असून, नगर जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी हे पाथर्डी तालुक्यात तळ ठोकून शोधमोहीम यंत्रणेचे संचालन करीत.
पाथर्डी तालुक्यात बिबटय़ाने दहशत माजविली असून, गेल्या 15 दिवसांत तीन बालकांना पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले आहे. त्यामुळे बिबटय़ाला पकडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आज सिन्नर, जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, संभाजीनगर व बीड येथील पथके दाखल झाली असून, त्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे.
अत्याधुनिक साधनसामग्रीसह शोधमोहीम
सर्चलाइट, नाइट व्हिजन कॅमेरे, दरीत उतरण्यासाठी अत्याधुनिक टय़ूब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे, रेस्क्यू व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्ट, वॉकीटॉकी सेट अशा सर्व अत्याधुनिक साधनसामग्रीसह वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगररांगांच्या निर्जन प्रदेशात सर्व अधिकारी व कर्मचारी विखुरले आहेत. बिबटय़ाने तीनही हल्ले रात्री केले असल्याने निशाचर बिबटय़ा समजून शोधमोहिमेची आखणी करण्यात आली आहे. अशा मोहिमेमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्वच अधिकाऱयांना पाचारण करण्यात आले आहे.
बिबटय़ाला पकडण्यासाठी ठिकठिकाणी 18 पिंजरे
तालुक्यात ठिकठिकाणी सध्या 18 पिंजरे लावले असून, आवश्यकतेनुसार पिंजऱयांची संख्या वाढविण्यासाठी इतर जिह्यांतून पिंजरे मागविण्यात आले आहेत. बिबटय़ाचा माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे. शोधमोहिमेतील बहुतेक कर्मचारी कमी वयोगटातील व अत्यंत तंदुरुस्त आहेत. या मोहिमेत परिसरातील भटक्या जमातीतील लोकांना सामावून घेण्यात आले आहे. गंध, पावलांचे ठसे, अन्य प्राणी व पक्ष्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे विशिष्ट आवाज यांचाही उपयोग केला जात आहे. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शिरसाट यांच्या पथकातील कर्मचारी मायंबा परिसरातील माथ्यापासून पायथ्यापर्यंत विशेष साधनसामग्रीसह शोधमोहीम सुरू करणार आहेत.
बिबटय़ा आढळून आलेल्या गावांमधील रहिवाशांनी विशेष काळजी घेऊन लहान मुलांना सायंकाळनंतर घराबाहेर पडू देऊ नये, रात्री घराबाहेर झोपू नये, घराबाहेर विजेची पुरेशी व्यवस्था करावी, शोधमोहिमेसाठी पाथर्डी व मढी येथे दोन विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत. रात्री गस्त घालताना अजूनही ग्रामीण भागात घराबाहेर झोपणारे लोक आढळून आले आहेत.
– आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, नगर.




























































