
सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ
जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारातील पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका ५३ वर्षीय इसमाला आपल्या शेतातील आखाड्यावर बोलवून घेऊन धक्काबुक्की करण्यात आली. या मारहाणीपासून वाचण्यासाठी शेतातून पळताना बांधावरील विद्युत तारेला अडकून व विजेचा शॉक लागल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना परळी तालुक्यातील कासारवाडी येथे घडली आहे. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश विठ्ठलराव हांडे रा. नखतवाडी ता. सोनपेठ जि. परभणी याचे वडील विठ्ठलराव आश्रुबा हांडे वय ५३ वर्षे हे दि. २० रोजी घरून गाय विकलेले पैसे आणतो असे सांगून कारबेटवाडी येथील श्रीमंत माधवराव चौधरी यांच्या घरी गेले होते. सायंकाळी ६.३० वा. सुमारास श्रीमंत माधवराव चौधरी यांच्या फोनवर फोन आला व कासारवाडी येथील नाथराव उत्तम दहिफळे यांच्या आखाड्यावर या असे सांगितले. त्यावरून ते दोघे आखाड्यावर गेले असताना आरोपी नाथराव उत्तम दहिफळे व मंचक पाटलोबा गुट्टे या दोघांनी पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद केला. या दोघांनी धक्काबुक्की करत मारहाण सुरू केली असताना मयत विठ्ठलराव आश्रुबा हांडे हे पळू लागले. पळताना शेतातील बांधावर कुंपण केलेल्या तारेला ते अडकले. या तारेत विद्युत प्रवाह सुरू होता. त्यामुळे विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.






























































