सांगली – कौटुंबिक वादातून डॉक्टर भावाचा गळा चिरून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा विळ्याने गळा चिरून खून केल्याची घटना कुपवाड येथे भरदिवसा घडली. डॉ. अनिल बाबाजी शिंदे (वय 43) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी संपत बाबाजी शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

कुपवाड–मिरज रस्त्यालगत एका अपार्टमेंटमध्ये भाडय़ाच्या खोलीत डॉ. अनिल शिंदे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे शिंदे घरात ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. त्यावेळी हातात धारदार विळा घेऊन आलेल्या संशयित संपत शिंदे याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि डॉ. अनिल शिंदे यांच्या गळ्यावर धारदार विळ्याने हल्ला केला. सात ते आठ घाव वर्मी बसल्याने शिंदे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. डॉ. शिंदे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने संशयित हल्लेखोर संपत पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. डॉ. अनिल शिंदे यांचा कुपवाड एमआयडीसी मुख्य रस्त्यालगत ‘आधार क्लिनिक’ या नावाने दवाखाना आहे. पत्नी सरस्वती या जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करतात. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मालमत्ता वाटणीतून सख्ख्या भावानेच हा खून केल्याचचे उघड झाले आहे. याप्रकरणी संपत शिंदे याला अटक करण्यात आली आहे.