
बहिणीला वारंवार फोन करतो या रागातून एका वॉचमनने ओळखीच्या दुसऱया वॉचमनची हत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली. गुन्हा केल्यानंतर आरोपीने पळ काढला आहे.
अशोक कुमार सिंग (29) असे मृताचे नाव असून तो वडाळय़ाच्या राम मंदिराशेजारील जीबीडी रामसेतू कन्स्ट्रक्शन साईटवर वॉचमनचे काम करत होता. त्याच परिसरात अभिषेक कुमार सिंग हादेखील वॉचमनचे काम करत होता. दरम्यान, अशोक सारखा बहिणीला फोन करतो म्हणून अभिषेकला त्याचा राग होता. हा राग अनावर झाल्याने शनिवारी रात्री त्याने लोखंडी रॉडने अशोकच्या डोक्यावर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या अशोकचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे कांड केल्यानंतर अभिषेकने पोबारा केला. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात दाखल असून पोलीस अभिषेकच्या शोध घेत आहेत.


























































