
सामना प्रतिनिधी । मुंबई
अवनी वाघिणीला राज्याच्या वनखात्याने निर्दयीपणे ठार केल्याने संतापलेल्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तर आता थेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हकालपट्टीचीच मागणी केली आहे. दुसरीकडे मुनगंटीवार हेसुद्धा ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी मनेका यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी करून राजकीय फटाका फोडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सबुरीची भूमिका घेत मुनगंटीवारांची पाठराखण केली आहे. ऐनदिवाळीत भाजपच्या मंत्र्यांमध्ये असे राजकीय फटाके फुटत आहेत.
यवतमाळमधील पांढरकवडा वन विभागातील अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्याचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सोशल मीडियावरून वक्तव्य करण्यापूर्वी पन्नास पैसे खर्च करून एक फोन केला असता तरी मी सर्व माहिती दिली असती, असा टोला वनमंत्री मुनगंटीवार यांनी मारल्यामुळे मनेका गांधी प्रचंड संतापल्या आहेत. अवनी वाघिणीच्या हत्येला जबाबदार धरत मुनगंटीवार यांची वनमंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्या हकालपट्टीची मागणी केल्यानंतर देशासह राज्यातील वन्यप्रेमींनीही मुनगंटीवार यांना हाकला अशी जोरदार मागणी सुरू केली आहे.
मुनगंटीवार यांचा प्रतिहल्ला
वनमंत्री पदावरून हाकलण्याची मागणी केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी प्रतिहल्ला करीत मनेका गांधी यांच्याच राजीनाम्याची मागणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. मनेका गांधी या महिला व बालविकास मंत्री आहेत. देशात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून मनेका गांधी यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा मग माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, असा सल्ला मुनगंटीवार दिला.
अवनीला ठार मारल्यानंतर दोन वन कर्मचाऱ्यांमधील टेलिफोन संभाषणाची क्लिप मंगळवारी एका खासगी वृत्तवाहिनीने प्रसारित केली आणि खळबळ उडाली. या क्लिपची सत्यता पडताळता आलेली नाही. शिवाय वनखात्याकडूनही कोणताच खुलासा झालेला नाही.
- अधिकारी 1 : जब (शिकार) हुआ तब डीएफओ को खबर नही दिया क्या?
- अधिकारी 2 : वहा पे आरएफओ भी नही था, कोई भी नही था…
- अधिकारी 1 : नाले के उपर था, जैसे ही आया, लाईट लगाई और गोली मार दी
- अधिकारी 2 : ट्रँक्किलायझर वगैरा कुछ दिया नहीं क्या ?
- अधिकारी 1 : ना, ना. लेकिन वो पोस्टमॉर्टम मे आ जाएगा
अवनीच्या हत्येला जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्वरित हटवावे. – मनेका गांधी, केंद्रीय महिला व बालविकासमंत्री
माझ्या राजीनाम्यापूर्वी मनेका गांधी यांनीच राजीनामा द्यावा. देशात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढलेय. – सुधीर मुनगंटीवार, राज्याचे वनमंत्री
मुनगंटीवार बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते
अवनीच्या एन्काऊंटरच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र धाराशीवमध्ये प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांची पाठराखण केली. मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. अवनीला मारल्याचे आम्हाला सगळ्यांनाच दुःख आहे. मात्र वाघिणीला मारण्यासाठी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत काही चूक झाली असेल तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. मात्र याप्रकरणी आपण स्वतः मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.





























































