मणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. नुकते मैतेई समाजातील दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी बैठक घेतली आहे.
बेपत्ता झालेल्या दोन मैतेई पुरुषांचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना कुकी अतिरेक्यांपासून त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले.
महत्त्वाचे म्हणजे, तीन मैतेई पुरुष स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जनरल ड्युटी भरती परीक्षेसाठी शुक्रवारी केइथेमंबी येथे उपस्थित राहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे जात असताना त्यांचा रस्ता चूकला आणि ते जवळच्या कुकी जमातीचे वर्चस्व असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात भरकटले.
एन जॉन्सन सिंह अशी ओळख असणाऱ्या व्यक्तीची संयुक्त सुरक्षा दलांनी कांगपोकपी येथून सुटका केली आणि त्याच दिवशी त्याला इंफाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
‘एन जॉन्सन सिंह अशी ओळख असणाऱ्या एका तरुणाची सुटका करण्यात आली आहे आणि सुरक्षा दलांच् जवानांनी त्याला सुरक्षी दिली आहे. तर थॉइथोयबा सिंह आणि ओ थोइथोई सिंह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इतर दोन तरुणांचा शोध सुरू आहे’, अशी माहिती केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
बिरेन सिंह यांनी या घटनेचा निषेध केला आणि सांगितले की राज्य सरकार पीडितांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहे.
“आज माझ्या सचिवालयात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतली. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर विशेषत: कुकींनी केलेल्या दोन निष्पाप तरुणांचे अपहरण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही अशा घृणास्पद कृत्यांचा निषेध करतो आणि आमचे सरकार पीडितांची सुरक्षित सुटका करण्यासाठी काम करत आहे’,असे मुख्यमंत्र्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे दोघे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्यानंतर राज्य पोलीस आणि केंद्रीय दलाच्या संयुक्त दलाने शुक्रवारपासून शोध मोहीम राबवली, असं पोलिसांनी सांगितलं.