
पूर्व उपनगरात चोरी केलेले आयफोन नेपाळला पाठवणाऱ्या टोळीचा मानखुर्द पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मानखुर्द पोलिसांनी 7 जणांना अटक करून 17 लाखांचे विविध मोबाईल जप्त केले आहेत. बहुतांश चोरीचे आयफोन हे नेपाळला पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. नेपाळमध्ये आयफोन घेणाऱयाचा मानखुर्द पोलीस शोध घेत आहेत.
मानखुर्द येथे राहणारा तरुण हा दहा दिवसांपूर्वी मंडाला येथून रिक्षाने जात होता. तेव्हा विरुद्ध दिशेने आलेल्या एका चोरटय़ाने तरुणाचा मोबाईल घेऊन पळ काढला. मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे, राजू सुर्वे, सहाय्यक निरीक्षक गणेश वाघ, किरण आंबेकर, याने तपास सुरू केला. तपासात एकाचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सात जणांना अटक केली. चोरीचे मोबाईल ही टोळी उत्तर प्रदेश, कोलकाता आणि नेपाळ येथे पाठवत असल्याचे तपासात समोर आले. तसेच या टोळीने 43 मोबाईलचे पार्ट काढून त्याची विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करून तब्बल 17 लाख 85 हजारांचे विविध मोबाईल जप्त केले आहेत. ही टोळी नेपाळ येथे काहींना मोबाईल विक्रीसाठी देत असायचे. आतापर्यंत काही आयफोन या नेपाळला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.





























































