
राज्य सरकार मराठय़ांना झुलवत आहे. चर्चेचे नाटक करून मराठय़ांच्या भावनांशी क्रूर खेळ करण्यात येत आहे. किती दिवस हे नाटक करत बसायचे. त्यामुळे आता एकच महाटोला, चलो मुंबई! 20 जानेवारीला आंतरवाली सराटी येथून मराठे मुंबईकडे कूच करतील. आझाद मैदानावर मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहील, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील विशाल सभेत केली. तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय ते मुंबईहून माघारी परतणार नाहीत, असेही जरांगे यांनी सरकारला बजावले.
बीड येथे छत्रपती संभाजी महाराज चौकातील पाटील मैदानात मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा झाली. जरांगे यांनी सुरुवातीलाच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. शेलक्या शब्दांत त्यांनी भुजबळांवर फटकारे ओढले. बीडमधील जाळपोळ मराठय़ांनी केली नाही. हॉटेल, घरे यांनीच जाळली आणि डाग मात्र आमच्यावर लावला. जाळपोळ प्रकरणात नाहक मराठा तरुणांना गोवण्यात येत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. राज्य सरकार भुजबळांच्या इशाऱयावर नाचत आहे. सरकारने त्यांचे ऐकून मराठय़ांच्या नादी लागू नये, नसता जड जाईल. तुम्ही ट्रक्टरला दाबू शकता मराठय़ांना नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतीची कामे उरकून घ्या, घराची व्यवस्था नीट लावा
आरक्षणाची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. आता एक घाव दोन तुकडे. मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. वेळ अत्यंत कमी आहे. शेतीची कामे उरकून घ्या, पिकांना पाणी द्या, कापूस वेचून घ्या आणि लगेच विकून टाका. मुंबईला येताना घराची नीट व्यवस्था लावा. आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी कूच करायची आहे. त्याची सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल, असेही जरांगे म्हणाले. रस्त्याने पोलिसांना सहकार्य करा, पण सरकारला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
उपोषण सुरू झाल्यावर चर्चा बंद
आझाद मैदानावर उपोषण सुरू झाल्यानंतर मात्र चर्चेची कवाडे बंद होतील. त्यापूर्वी सरकारने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. मुंबईत मी उपोषणाला बसल्यावर मला भेटण्यासाठी तुम्ही येणार. येताना सोबत शिदोरी आणा, अंथरुण-पांघरुण घेऊन या. मराठय़ांचा महाप्रलय पाहून सरकारला धडकी भरली पाहिजे, असे जरांगे म्हणाले.
जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये जंगी रॅली आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात 200 जेसीबींच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुस्लिम बांधवांच्या वतीनेही मनोज जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. जरांगे यांचे व्यासपीठावर आगमन होताच हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी करण्यात आली.
बच्चू कडूंची मध्यस्थी निष्फळ
मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू तसेच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी सकाळीच बीड गाठले. एका हॉटेलात जरांगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली, परंतु काही मुद्दय़ांवर सहमती न झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी सरकारची आहे, आपण आंदोलकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. सगेसोयरे या शब्दाची व्यवस्थित व्याख्या झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा जात संपविण्याचा घाट
प्रत्येक राज्यात असलेल्या मोठय़ा जाती संपविण्याचा घाट घालण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मराठा समाजाला संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे, परंतु मराठा आरक्षणात जो आडवा येईल त्याची खैर नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देशाचे रक्षण करणाऱया लढवय्या मराठा जातीचा सरकारने खेळ चालविला आहे, असा संताप यावेळी जरांगे यांनी व्यक्त केला. आता देव जरी आडवा आला तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.
तगडा पोलीस बंदोबस्त, शाळा बंद
मनोज जरांगे यांची इशारा सभा, रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गासह नगर-परळी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. शिक्षणाधिकाऱयांनी खास नोटीस काढून शाळा, महाविद्यालयांना सुट्टंाr जाहीर केली. त्याचबरोबर व्यापाऱयांनीही आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सभेला पाठिंबा दिला. सभेला येणाऱयांसाठी 22 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, झुणका-भाकर, साबुदाण्याची खिचडी व पाण्याची सोय करण्यात आली होती.
येवल्याचं येडपट फडफडतंय!
‘येवल्याचं येडपट फडफडतंय’ अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र्ा सोडले. बीडमधील जाळपोळ यांनीच केली. हॉटेल, घर यांनीच जाळले आणि आळ मात्र निष्पाप मराठा पोरांवर घातला. भुजबळांच्या इशाऱयावर सरकारने नाचू नये, अन्यथा सरकारला अतिशय जड जाईल. भुजबळांनी माझ्या नादाला लागू नये, मी बेकार माणूस आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
केसालाही धक्का लागला तर याद राखा!
मराठा मंडळी आरक्षणासाठी मुंबईत धडकल्यानंतर मागची संपूर्ण आघाडी महिलांनी सांभाळायची आहे. आमच्या केसालाही धक्का लागला की, महिलांनी आपल्या आमदार, खासदारांच्या घरी जाऊन बसायचे आणि जाब विचारायचा, अशी सूचना त्यांनी मराठा महिलांना केली.
































































