
सामना ऑनलाईन | सोची
यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद होणाऱ्या माजी विश्वविजेत्या अर्जेन्टिनाला एक पैसाही न घेता फुकट प्रशिक्षण देण्याची ऑफर सुपरस्टार दिएगो मॅराडोनाने दिली आहे. आपल्या संघाच्या या अपयशाने मॅराडोना अतिशय दुःखी झाला आहे. देशासाठी फुटबॉल संघाला फुकट प्रशिक्षण देऊन पुन्हा टॉपवर आणण्याचा आपला निर्धार असल्याचे मॅराडोनाने व्हेनेझुएलेन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अर्जेन्टिनाचे सध्याचे प्रशिक्षक जॉर्ज संपोली यांच्या कार्यकाळाची मुदत २०२२ पर्यंत आहे. असे असले तरी देशाच्या फुटबॉल महासंघाने सांगितल्यास देशप्रेमाखातर अर्जेन्टिनाला विनाशुल्क प्रशिक्षण देण्याची तयारी माजी कर्णधार मॅराडोनाने दर्शवली आहे.
बोका जुनिअर आणि नापोली या नामवंत फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २०१० मध्ये अर्जेन्टिनाला प्रशिक्षण दिले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या संघाने २०१०च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत जर्मनीने अर्जेन्टिनाला उपांत्यपूर्व फेरीत ४-० असे पराभूत केले होते.आजही प्रसिद्धीमाध्यमांसाठी आकर्षण ठरणाऱ्या मॅराडोनाने संयुक्त अरब आमिरातीतील दोन क्लबनाहि प्रशिक्षण दिले आहे.
मनातून मी दुःखीच -मॅराडोना
रशियातील विश्वचषक लढती पाहताना वरून मी आनंदी दिसत असलो तरी अर्जेन्टिनाच्या यंदाच्या अपयशाने मला अतिशय दुःख झालेय, गेल्या काही वर्षांत आम्ही जे कमावले ते या अपयशाने पार धुळीला मिळाले आहे, अशी खंत सुपरस्टार मॅराडोनाने बोलून दाखवली.




























































