
सामना ऑनलाईन, तुळजापूर
मराठा समाजाच्या वतीने आत्तापर्यंत ५८ मूक मोर्चे निघाले. मोठ्या संख्येने मराठा बांधव एकवटले मात्र तरीही सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्याची दखल घेतली गेली नाही, यामुळे येत्या दिनांक २९ जून पासून मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वास सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दारात जागरण-गोंधळ घालून सुरुवात केली जाणार आहे. यापुढील मोर्चे हे ’मुकमोर्चे’ नसून ’ठोक मोर्चे’ असणार आहेत असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने दिला आहे.
बुधवार म्हणजेच २० जून रोजी तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीची आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी, शैक्षणिक सवलतींचा अध्यादेश तात्काळ काढावा, शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात या प्रमुख मागण्या सरकारकडून लागू करवून घेण्यासाठी या बैठकीत रणनिती आखण्यात आली आहे.
सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव तरतूद, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ यासह अन्य काही घोषणा केल्या मात्र त्या निव्वळ फसव्या निघाल्याचा आरोप या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे गनिमी कावा पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने राज्यभर मोर्चे काढण्यासाठी नव्याने आखणी करण्यात येणार आहे. देवीसमोर जागरण-गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर तुळजापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चास प्रारंभ होणार आहे. यावेळी मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे. या मोर्चात सकलसमाज बांधवानी पारंपारिक शस्त्र तसेच औजारांसह सहभाग घ्यावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील (पुणे) यांच्यासह विजय पवार, रमेश कोरे-पाटील, श्रीमंत कोकाटे, सज्जनराव साळुंके, वसंतराव पाटील, किशोर पवार, जगदीश पाटील, सतिश खोपडे, अर्जुन साळुंके, नितीन पवार, प्रतिक रोचकरी, सज्जन जाधव, जीवनराजे इंगळे, विष्णु इंगळे, जगदीश पलंगे, आलोक शिंदे, सुनिल नागणे, रामभाऊ गायकवाड, विजय पवार, देवीदास पाटील, धनंजय देशमुख, भैय्या पाटील, प्रदीप मुंडे उपस्थित होते.






























































