
मराठा समाजाला सरसकट ओबीस प्रवर्गातून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागरे, प्रतापसिंग पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली.
‘आम्ही 24 तारखेपर्यंत वाट पाहत आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च निघेल, ते सरकारला झेपणार नाही’, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं राज्य सरकारला दिला आहे. ‘क्यू रिव्ह्यू पिटीशनवेळी आम्हाला नेहमीच सांगण्यात आलं की आरक्षण त्यातून मिळेल, पण कसं मिळेल हे काही सांगण्यात आलं नाही. आणि पुन्हा त्याविरोधातच खतपाणी घालतात. सगळे एकामाळेचे मणी आहेत. तेव्हा सरकारनं मराठा समाजाचा खेळ थांबवावा’, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसंच, ‘सर्वोच्च न्यायालयात जे क्यू रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यात आलं आहे त्या पिटीशन बाबतीत सरकारनं खुलासा करावा, टास्क फोर्स तयार करावं, तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्याचा एकमेव मार्ग आहे त्या मार्गाच्या बाबतीत खुलासा करावा’, अशी मागणी त्यांनी केली.

























































