
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी न करता आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज केली. अठरापगड जातीच्या समाज संघटनांची मोट बांधून निवडणुकीला सामोरे जाऊ असेही जाहीर करण्यात आले. निवडून आल्यानंतर उमेदवार राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊ नयेत म्हणून निवडणुकीपूर्वीच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढल्यानंतर आणि आरक्षण आंदोलनात 42 समाजबांधव हुतात्मा झाल्यानंतर मराठय़ांना आरक्षण मिळाले; पण त्यानंतरही समाजाचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या आंदोलनादरम्यान 13700 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ते मागे घेण्याचे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केले नसल्याने मराठा समाजात रोष असल्याचे पाटील यांनी सांगितले.
3500 मराठा विद्यार्थी अडचणींच्या घेऱ्यात
मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश, फी माफी, वसतीगृह, शिष्यवृत्ती याबद्दल अद्यापही अडचणी आहेत. जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअरच्या जाचक अटींमध्ये मराठा विद्यार्थी भरडले जात आहेत. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्यावर प्रभावीपणे आवाज उठवलेला नाही. यामुळे आता सरकारमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधी पाठवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

























































