
आसावरी जोशी,[email protected]
पुण्याचे… मराठी मनाचे… महाराष्ट्राचे भूषण… अभिमान शनिवार वाडा. रणधुरंधर पहिले बाजीराव पेशवे यांनी 22 जानेवारी 1732 रोजी तो बांधला. यानिमित्ताने शनिवार वाडा आणि आजचे पेशवे यांचा घेतलेला वेध.
प़ुण्याचे भूषण… पंतप्रधान पेशव्यांचे झळाळते कर्तृत्व शनिवार वाडा. पहिले बाजीराव पेशवे अर्थात राऊंचा वाडा. श्रीमंत पेशवाईचा अमूल्य ठेवा.
अपरिचित, नवख्या, अमराठी माणसांसाठी गर्दीने ओसंडणाऱया पुण्यातील महत्त्वाचा वाहनतळ, अनेक विघातक, स्वतःला तथाकथित राजकीय म्हणविणाऱयांचे विनाकारण आणि मूर्ख जातीय द्वेष जाहीर करण्याचे ठिकाण, असंख्य अनधिकृत फेरीवाल्यांची फुकट मिळालेली जागा, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट पाहिलेल्यांच्या दृष्टीने उत्सुकता, एक पर्यटनस्थळ.
…आणि अस्सल स्वाभिमानी, इतिहासाचा आदर करणाऱया महाराष्ट्राच्या, मराठी मनाच्या दृष्टीने शनिवार वाडा म्हणजे श्रीमंत पेशवाई… राऊ बाजीराव पेशव्यांचे अजोड… अमोघ कर्तृत्व… संयत माधवराव पेशव्यांचा धीरोदात्त समजूतदारपणा, काशीबाई, मस्तानी, गोपिकाबाई, रमाबाई, आनंदीबाई, पार्वतीबाई या समस्त राणीवशाचा व्यक्त अव्यक्त हुंकार. पेशव्यांचा दिमाख, त्यांचा मुत्सद्दीपणा, त्यांचा डामडौल, कर्तृत्व, नेतृत्व… आणि अजून बरेच ज्ञात अज्ञात ऐतिहासिक पैलू… इंग्रजांनी बळजोरीने आणि उद्दामपणे संपवलेल्या बलाढय़ मराठी साम्राज्याचे केविल भग्नावशेष.

22 जानेवारी 1732 रोजी पुण्यात पंतप्रधानांचे हे शाही निवासस्थान मोठय़ा दिमाखात उभे राहिले. पाहूया ज्ञात-अज्ञात शनिवार वाडा.
इ. स. 1713 मध्ये छत्रपती संभाजीपुत्र शाहूंनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्र दिली. बाळाजीपंत सुपे, सासवडहूनच राज्यकारभार पाहत होते. पुढे 1720 मध्ये थोरले बाजीराव पेशवे झाले. त्यांचेही वास्तव्य सुप्यास होते. त्याच सुमारास पुणे प्रांत राऊंना वंशपरंपरागत इनाम मिळाला आणि निवासासाठी, राज्यकारभारासाठी पुणे मुकर्रर करण्यात आले.
मुठा नदीच्या काठाला पूर्वी एक गढी आणि कोट होता. या गढीच्या दक्षिणेस शनिवार वाडा बांधायचे ठरले. या जागेबद्दल एक दंतकथा सांगितली जाते की, राऊ येथे फिरायला आले तेव्हा त्यांना एक ससा कुत्र्याचा पाठलाग करताना दिसला. या जागेत त्यांना विलक्षण काहीतरी जाणवले. निवासासाठी त्यांनी हीच जागा नक्की केली.
10 जानेवारी 1730 रोजी पायाभरणी झाली आणि वास्तूशांत 22 जानेवारी 1732 रोजी झाली. शनिवार पेठेत बांधला गेला म्हणून शनिवार वाडा. त्यावेळेस एकूण खर्च सोळा हजाराच्या घरात गेला.
पुढे बरीच वर्षे शनिवार वाडय़ात नवनवी बांधकामे केली गेली. पाण्यासाठी असलेल्या विहिरी अपुऱया पडल्यानंतर राऊंचे पुत्र नानासाहेब पेशव्यांनी कात्रजहून पाणी आणले. वाडय़ात नोकरचाकरांसहित 1000 माणसं वावरत असत.
शनिवार वाडय़ातील गणेश रंगमहाल नानासाहेब पेशव्यांनी 1755मध्ये उभारला. पेशवे अत्यंत गणेशभक्त होते. गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. महालाच्या टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती. शिवाय कारंजे आणि फुलबागही होती.
शनिवार वाडय़ात अनेक चौक होते. लाल चौक, मोती चौक याला गोपिकाबाईंचा चौकही म्हणत असत. याखेरीज फडाचा चौक, मुदपाक चौक, पक्वान्न चौक असा बराच ऐसपैस कारभार
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद आहे. त्यानुसार रत्नशाळेत 51, 402 हीरे, 11,352 माणके, शिवाय अमाप पाचू, मोत्ये, नीलम इ. मौल्यवान खडे होते. यातील बहुतांश खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुसऱया नानासाहेब पेशव्यांना मिळाला. हा खजिना त्यांनी एका विहिरीत लपवला. इंग्रजांनी तोही काढून घेतला.
शनिवार वाडय़ाचा मुख्य प्रासाद हा सहा मजली उंच होता. आळंदीच्या देवळाचा कळस सहाव्या मजल्यावरून दिसत असे.
17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांनी शनिवार वाडय़ावर युनियन जॅक फडकावला. पुढे 1827 मध्ये लागलेल्या महाभयंकर आगीत ही सुंदर, भव्य वास्तू जळून खाक झाली. ही आग विझवण्यास कुणीही आले नाही. सात दिवस शनिवार वाडा जळत होता. असे म्हणतात की ही आग इंग्रजांनीच लावलेली होती. इंग्रजांना चिवटपणे झुंजवणाऱया मराठय़ांवर इंग्रजांचा अतिशय राग होता. दुःस्वास होता. त्यातूनच ही आग लावली असावी.
इंग्रजांनी शनिवार वाडय़ाचे कारागृह केले. तळमजला कैदी ठेवण्यासाठी, दुसऱया मजल्यावर अपंगांसाठी गृह आणि दवाखाना होता. तिसऱया मजल्यावर वेडय़ांचे इस्पितळ होते.या राजेशाही घराण्याचे वंशज अर्थात पेशव्यांचे वंशज कुठे आहेत… वैभवशाली इतिहास आणि आजचे वर्तमान याची सांगड ते कशी घालताहेत.
स्थळ…पुणे. प्रभात रस्त्यावरील सातव्या गल्लीतील ‘रघुनाथ’ बंगला. पंतप्रतिनिधी. पेशव्यांचे वंशज येथे राहतात. हे पेशव्यांचे निवासस्थान आहे याची बाहेरून कल्पनाही येत नाही. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. विनायकराव पेशवे, सौ. जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सूनबाई आरती व नातवंडं असे पेशवा कुटुंब येथे राहते. डॉ. विनायकरावांनी पुणे विद्यापीठात नोकरी केली. मुलगा आर्किटेक्ट आहे. पेशव्यांची दोन कुटुंबं पुण्यात आहेत. दुसरे कुटुंब कृष्णराव पेशवे. उत्तम रत्नपारखी. पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सूनबाई, नात असे छोटेसे कुटुंब.
या मंडळींकडे पिढीजात मालमत्ता, जमीनजुमला इ. काहीही आलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा पेशव्यांवर असलेला अतोनात राग. त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या. वारसा म्हणून या मंडळींना मिळाले आडनाव आणि वाराणसीतील गणेश मंदिर. याची पूर्ण व्यवस्था पेशवे घराण्याकडे आहे. त्यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी मिळून ट्रस्ट स्थापन केला आहे. मंदिर अत्यंत सुस्थितीत आहे. दरवर्षी येथे पारंपरिक मराठी पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या घरातील गणपती सात दिवसांचा. वाराणसीतील हा पेशव्यांचा उत्सवही सात दिवसांचा असतो. शारदीय नवरात्रही येथे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. अष्टमीच्या दिवशी तांदळाच्या उकडीचा देवीचा मुखवटा केला जातो. घागरी फुंकल्या जातात.
आज एक सामान्य, प्रतिष्ठत जीवन जगताना पेशवेपणाचे ओझे कोठेही जाणवत नाही. जाणीव आणि माहिती असलेले पुणेकर, वाराणसीकर या राजघराण्याला भरपूर मान देतात, आदर करतात. जे काही मिळवायचं ते आपल्या कर्तृत्वावर, मेहनतीवर, कष्टावर हा राऊंचा वारसा प्रत्येक पेशव्यांनी जपलाय, जोपासलाय आणि वाढवलाय. तथाकथित राजकारणाच्या अजिबात भानगडीत न पडता आपल्या साध्या पण उच्चशिक्षित आणि संस्कारी राहणीतून आजचे पेशवे इतर अनेक राजघराण्यांना आणि राजकारण्यांना अत्यंत प्रामाणिकपणाचा पाठ घालून देत आहेत.
























































