रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ! राज्यपाल रमेश बैस यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. येत्या काळात अमरावतीमधील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्र दिनी केली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व अन्य उपस्थित होते.

पालिका संगीत कला अकादमीला 25 हजारांचे बक्षीस

मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे क्रीडा भवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या संगीत कला अकादमीला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

मराठीतून भाषणाची सुरुवात

राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने येत्या 2  ते 9 जून या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.