
गीतेश शिंदे
समीक्षकांनी अभ्यासाच्या सोयीसाठी मराठी साहित्याला- कवितेला विविध कालखंडांत विभागले. आजही मराठी कवितेची व्याप्ती, परिमाणकारकता साठोत्तरी कवितेच्या मोजपट्टीने मोजली जाते. त्यानंतरही बरेच प्रवाह मराठी कवितेत दाखल झाले. अनेक लिहिते हात कालौघात मागेही पडले; परंतु 1970 नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्वावर तेजस्वी मुद्रा उमटवली. ‘सत्यकथा’ मासिकाच्या मे 1966च्या अंकात त्यांची ‘योगभ्रष्ट’ ही प्रदीर्घ कविता प्रसिद्ध झाली. तेव्हापासून आजतागायत ते तितक्याच ताकदीने कवितेतून व इतर साहित्यप्रकारातून व्यक्त होत आहेत. ‘योगभ्रष्ट’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1972 मध्ये मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध झाला. त्यातील सर्व कविता 1966 ते 1971 या काळातील आहेत. त्यांच्या कवितांतून आणि रेखाटलेल्या चित्रांतून त्यांच्या अंतर्मनातील तीव्र तडफड, अस्वस्थता आणि उद्रेक हे सारे अत्यंत पारदर्शी शब्दांत प्रकट झाले आहे. मनातील भावकोमल मृदू स्वर या कवितेत समांतरपणे मुखर झाले आहेत. ‘शुभवर्तमान’, ‘शुनःशेप’ हे कवितासंग्रह 80-90च्या दशकात प्रसिद्ध झाले. त्यावर दुर्बोधतेचा व वाचकाभिमुख नसल्याचा शिक्कादेखील मारला गेला; पण आणीबाणीनंतरचा अस्वस्थ भवताल, सामान्यांचा दबलेला स्वर या कवितांतून सामोरा आला. 2009 साली प्रसिद्ध झालेल्या ‘चित्रलिपी’ या कवितासंग्रहाकरता त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले. त्यानंतर 2016 साली ‘कॉपर कॉइन’ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेला डहाके सरांचा ‘रूपान्तर’ हा कवितासंग्रह नव्या सहस्रकातील तीव्र स्पर्धा, नातेसंबंधांतील ताणेबाणे, सर्वांत असूनही आलेले एकाकीपण, चंगळवादाने आलेली समृद्धता पण त्याचवेळी झपाटय़ाने नामशेष होणारी माणुसकी, निसर्गाबद्दलची अनास्था आणि त्याची भोगावी लागणारी फळं, गावगाडय़ाचे रुतलेले चाक, प्रॉडक्ट झाल्याची जाणीव, वाढती असहिष्णुता, धार्मिक तेढ हे सर्व बदल अत्यंत सूक्ष्मपणे टिपत भाष्य करतो.
‘रूपान्तर’ या पहिल्याच शीर्षक कवितेत ते म्हणतात,
मी कोणत्याही शब्दानं
करू शकत नाही दगडी प्रत्यक्षाचं
कोमल वास्तवात
रूपान्तर.
मानवी संवेदना कधी इतक्या जडशीळ, बथ्थड झाल्या? त्यांचे रूपान्तर केव्हा दगडात झाले? आता परिस्थिती इतकी आवाक्याबाहेर गेली आहे की, मायेचे पाझर पह्डण्यासाठी कुठलाही शब्द अपुरा पडावा. इतकी हतबलता यातून व्यक्त होते की, शेवटी जगण्याचा कल्लोळ मनावर आदळत राहतो पण त्याचाही आवाज उमटत नाही. मग अशावेळी पर्याय उरतो तो प्रार्थनेचा. आपल्या चिंता, अडचणी कोणावर तरी सोपवून टाकण्याचा मानवी स्वभाव असतो. त्याने कदाचित प्रश्न सुटतही नसावेत; परंतु या प्रार्थनेमुळे तात्पुरती को होईना, मनाला उभारी मिळते. आपल्या पाठीमागे सर्वरक्षक कोणीतरी आहे अशी जाणीव कठीण प्रसंगातून पार जायला बळ देते. पण कवी पुढल्याच कवितेत त्या सर्वशक्तिमान अस्तित्वाला सर्वरक्षक न म्हणता ‘सर्वभक्षक’ असे संबोधतात. आपले पाप, दुःख, यातना पोटात घेणारे, क्षमवणारे कोणीतरी आपल्याला हवे असते या अर्थाने सर्वभक्षण तू कर अशी प्रार्थना ‘सर्वभक्षक’ (पृ. क्र. 2) कवितेतून करताना कवी म्हणतात,
मी प्रार्थना करतो
सगळं जगणं दोन्ही डोळय़ांच्या तळहातात घेऊन.
माणसाची सतत नवा शोध घेण्याची धडपड आजन्म सुरू असते. बऱ्याचदा संपूर्ण आयुष्य जगूनही हाती काहीच लागत नाही; कारण हा शोध वरवरचा, किंबहुना बाह्यस्तरावरचा असतो. पण जेव्हा आपण स्वतःत डोकावतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा वेध घेता येतो. अनेकदा आपण आपल्या शहरातील रस्त्यांवरून भटकलेलो असतो, पण शहराची नस सापडत नाही. परंतु निर्हेतुकपणे जेव्हा या शहराच्या गल्ल्या पायाखाली तुडवतो तेव्हा शहराच्या धमन्यांतून धावणाऱ्या रक्ताचा डीएनए आपल्या हाती लागतो. अशावेळी आपणच माणूस म्हणून उघडे पडण्याचा धोका अधिक असतो.
एके ठिकाणी सध्याचे वातावरण सहिष्णुतापूर्ण नाही म्हणून कवी बैचेन होतो. विनाशाची अक्षरेच या शहराच्या फलकांवर लिहिली गेलीत असे त्याला वाटते. ‘हिंसेच्या झाडाला हिंसेचीच / पानंफुलं फुटत असतात.’ (पृ. क्र. 25) हे सत्य कवी ‘विनाशाची वर्णमाला’ या कवितेतून अधोरेखित करतो. ही पृथ्वी हळूहळू कुरूप होते आहे. शेवटी राखेची आणि कवटय़ांचीच यमपं कवितेत उतरतील आणि काळय़ाठिक्कर पृथ्वीची काळी कविता लिहिली जाईल असे ते म्हणतात, तेव्हा हा काळा रंग डोळय़ात उतरतो आणि भयाची एक गडद सावली मनावर दाटून येते. पुढे ‘सर्वनाशाच्या कविता’ (पृ. क्र. 26) या कवितेतूनही विनाशाचा हा भयप्रद कोलाहल काळीज चिरत जातो. आपण रंगांधळे झालो आहोत का, असा प्रश्नही कवीला पडतो. कारण त्याला फक्त काळा आणि पांढरा हे दोनच रंग कळतात. आपली रंगजाणीवच भ्रष्ट झाल्याचे नमूद करताना एक विदारक सत्य आपल्यासमोर ‘रंग’ (पृ. क्र. 35) या कवितेत मांडताना कवी लिहितात,
समोरून येणाऱ्या झुंडीला
काळा रुमाल दाखवावा की पांढरा
हे दहशतीनं बत्थड झालेल्या माझ्यासारख्यांना
कसं सुचावं?
जग हे असेच विविध रंगांत विभागले गेले आहे. हे रंग धर्मांनी, जातींनी वाटून घेतले आहेत. या रंगांच्या झुंडीच्या झुंडी अंगावर चाल करून येतात तेव्हा आपण निषेध नोंदवावा की पांढरे निशाण फडकवून समर्पण करावे हेही दहशतीमुळे सदसद्विवेकबुद्धीला सुचत नाहीये. त्यामुळे आता एकच रंग उरलाय, तो म्हणजे रक्ताचा- लालबुंद. आणि तोही पुढे काळपट होत काळाठिक्कर होतोय. या सर्वामुळे एक अनाथपण मनाला आले आहे. ओळखच गमावून बसल्याचे शल्य डाचते आहे. अंतःकरणात कधी हा विषादाचा काळोख भरला गेला, असे अनेक प्रश्न कवी या कवितांतून या व्यवस्थेला विचारतात. हरवलेपणाची, जगापासून नाळ तुटल्याची एक जाणीव सतत या कवितांतून डोकावते. ‘पत्ता लागत नाही’ (पृ. क्र. 57) या कवितेत तर ’वसंत आबाजी डहाके आता इथं राहत नाहीत’ असे कवी म्हणतो. समीक्षकांनी, वाचकांनी मारलेल्या दुर्बोधपणाच्या शिक्क्याला स्वीकारून कवी आपल्या कवितेच्या अंतःस्वराशी एकनिष्ठ असल्याचे इथे जाणवते. कालानुरूप डहाके सरांची कविताही तितकीच बदलली. त्यातील सामान्यांना जाणवणारा बोजडपणा जरी कमी झाला असला तरी आशयाची खोली वाढून विचारांची विस्तीर्ण नदी वाचकांना व्यापून टाकते. महानगरीय जाणिवांसोबतच ‘रूपान्तर’ या कवितासंग्रहातून ग्रामीण जीवनाचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे, कष्टकऱ्यांच्या नागवले जाण्याचे पडसादही उमटतात. पोतराजाप्रमाणे कवी कवितेच्या फटकाऱ्यांचे आसुड ओढतोय आणि त्याचे वळ वाचकाच्या मनाच्या पाठीवर उमटतात. या वेदनांचे रूपान्तर कालांतराने व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या आवाजात होईल असा आशावादही वाटतो.
रूपान्तर
लेखक – वसंत आबाजी डहाके
प्रकाशक -कॉपर कॉइन प्रकाशन
पृष्ठे – 72, मूल्य – रुपये 195/-
































































