४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदगीरात आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उदगीर

मराठवाडा साहित्य परिषद व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने २३, २४ ,२५ डिसेंबर या कालावधीत ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन उदगीर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व संमेलानाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दिली.

राजीव गांधी तंत्रनिकेतनच्या परिसरात अटल बिहारी बाजपेयी साहित्यनगरीत तीन दिवस हा साहित्याचा उत्सव संपन्न होईल. २२ रोजी सायंकाळी ग्रंथ दिंडी निघेल. या साहित्य संमेलनात उद्घाटन व समारोप सोहळ्याबरोबरच कविसंमेलन, कथाकथन, प्रकट मुलाखत, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी असल्याचे तिरूके यांनी सांगितले. यापूर्वी १९५६ मध्ये उदगीर येथे मराठवाडा साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर उदगीरला हा प्रथमच मान मिळत असून यामध्ये सर्व घटकांना सामावून घेऊन हे संमेलन व्यापक करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. ऋषीकेश कांबळे यांची निवड एकमताने झाली आहे. त्याची घोषणा मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी यापूर्वीच केली आहे. दरम्यान या संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी व्यापक बैठक स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीस माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव शशिकांत हिंगोणेकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब राठोड, उपाध्यक्ष रमेश अंबरखाने, संजय बनसोडे जिल्हा परिषदसदस्य राहुल केंद्रे, पं. स. सभापती सत्यकला गंभिरे, उपसभापती रामदास बेंबडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले, नगरसेवक विजय निटूरे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक धनंजय गुडसूरकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी तर आभार रसूल पठाण यांनी मानले.