
‘साथ जिएगे और साथ मरेंगे’ हे वचन खरे करून दाखवणारी घटना झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात घडली आहे. प्रेमात पडलेल्या या दोन व्यक्ती म्हणजे जोडपे नसून चक्क विवाहित महिला आहेत. या महिलांनी एकमेकांच्या प्रेमाखातर मृत्यूला कवटाळले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील चांगोसिंगा गावात ही घटना घडली आहे. या गावातील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची बातमी कळताच दुसऱ्याही एका महिलेने आत्महत्या केली. या दोन्ही घटना अवघ्या 15 मिनिटांतच घडल्या. एकाच गावातील दोन विवाहितांनी आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दोन्ही महिला विवाहित असून त्यांच्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. त्या दोघींचे एकमेकींवर जीवापाड प्रेम होते. दोन विवाहित स्त्रियांच्या प्रेम प्रकरणामुळे गावातील वातावरण बिघडू लागले होते. कुटुंबियांना समाजात वावरणे लज्जास्पद होत होते, मात्र उघडपणे कोणीही बोलून शकत नव्हते. त्यांच्या प्रेम प्रकरणाविषयी जेव्हा त्यांचे पती आणि कुटुंबियांना कळले तेव्हा त्यांना एकमेकींना भेटण्यापासून थांबवण्यात आलं. यामुळे या दोन्ही महिला तणावात होत्या. कोणाच्याही विरोधाला न जुमानता या दोघी एकमेकींना भेटत होत्या.
दोघींना एकमेकींपासून भेटण्याचे रोखले गेले तेव्हा 25 वर्षीय महिलेने विष प्राशन केले होते, तर दुसऱ्या 30 वर्षीय महिलेला हा प्रकार कळताच तिलाही स्वत:ला आवरता आले नाही आणि तिने खोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. यातील एका महिलेने आपल्या सासरी, तर दुसरीने आपल्या माहेरी आत्महत्या केली. समलैंगिक संबंधांमुळे एक महिला सासरी राहण्याऐवजी तिच्या माहेरी राहू लागली होती. त्यामुळे तिचे लग्नही मोडले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.
























































