लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये भीषण आग; रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे वेल्डिंगचे काम सुरू असताना उडाला भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आज लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये भीषण आग लागली. मुख्य आरक्षण केंद्रावर स्लीपिंग पॉडमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असतानाच आगीचा भडका उडाला. त्यामुळे बुकिंगसाठी आलेल्या प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱयांची प्रचंड पळापळ झाली. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी स्लीपिंग पॉडबरोबरच लागून असलेले जन आहार केंद्र जळून खाक झाले आहे. तसेच जवळपास वीस मिनिटे टर्मिनसमधील ओव्हरहेड वायर्सचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने येथून सुटणाऱया आणि येणाऱया एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा झाला.

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आरक्षण केंद्रावर पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी स्लीपिंग पॉड उभारण्याचे काम सुरू आहे. येथे वेल्डिंगचे काम सुरु असतानाच दुपारी पावणे तीनच्या सुमारास मशीनचा स्फोट झाल्याने फर्निचरने पेट घेतला. आग समोर असलेल्या जन आहार केंद्रात पसरल्याने भडका उडाला. तसेच टर्मिनसच्या बाहेरील बाजूला लावलेल्या ऍक्रॅलिकच्या शिटने पेट घेल्याने आकाशात धुराचे लोट उसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. रेल्वे कर्मचाऱयांनी प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे आरक्षण केंद्रातील वायर्स अक्षरशः वितळल्या. त्यामुळे येथील आरक्षण केंद्र तात्पुरते इतरत्र हलवण्यात येणार आहे.

मत्स्यगंधा एक्सप्रेसला लेटमार्क
एलटीटीहून दुपारी 3.20 वाजता सुटणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस आग लागली तेव्हा फलाटावर उभी होती. प्रवाशांची गाडी पकण्यासाठी धावपळ सुरू असतानाच आग लागल्याने रेल्वेने ओव्हर हेड वायर्सच्या माध्यमातून गाडय़ांना पुरवला जाणारा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे गाडी काही काळ खोळंबली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोठा अनर्थ टळला
आग लागलेले ठिकाण फलाट क्रमांक 1ला लागून आहे. आग लागली तेव्हा फलाटावर गाडी असती तर मोठा अनर्थ झाला असता.

रेल्वेचा सुरक्षा विभाग सुशेगात
प्रवाशांबरोबरच रेल्वेच्या सुरक्षेसाठी रेल्वेत स्वतंत्र सुरक्षा विभाग कार्यरत आहे. त्यांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून वेळोवेळी स्थानकांमध्ये जाऊन पाहणी करणे बंधनकारक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवणे अवश्यक आहे. पण रेल्वेचा विभाग सुशेगात झाला असून एखादी घटना घडल्यानंतर ते तेथे जाऊन पाहणी करतात हे अयोग्य असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.