
धारावीच्या नवरंग नगरात आज हाहाकार उडाला. रेल्वे रुळानजीक असलेल्या भंगाराच्या गाळ्यांना भीषण आग लागली. सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आग भडकली. त्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रुळालगत लागलेल्या या आगीमुळे हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. नागरिकांना रुळावरून चालत स्टेशन गाठावे लागले.
धारावीच्या शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंग नगरात रेल्वे रुळालगत झोपडपट्टी आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेथील एका गाळ्यात आग लागली. गाळ्यांमधील भंगार व अन्य साहित्य बाहेर काढले जात असताना दोन ते तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला. तेवढय़ात अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. शर्थीच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.
दुकानासह झोपड्यांचे नुकसान
आगीत चार ते पाच गाळे आणि पाच सहा झोपडय़ांचे नुकसान झाले. वेळीच काही गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळण्यात यश मिळाले. या आगीत सुदैवाने कोणी जखमी झाले नाहीत.






























































