
>> अजय गायकवाड
दुर्गंधी, अस्वच्छता, तुटलेले कंपाऊंड, मोडकळीस आलेली इमारत अशी काहीशी दुर्दशा माथेरानमधील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी डॉक्टर नसल्याने या दवाखान्याचा अक्षरशः खुराडे झाले आहे. त्यामुळे घोडे, माकड यांच्यासह अन्य पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजारी प्राण्यांवर उपचार कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
माथेरानमध्ये जवळपास ४६० प्रवासी घोड्यांसह मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची संख्या अधिक आहे. तसेच येथील शेतकरी व आदिवासी पाड्यातील ग्रामस्थ, बकऱ्या, कोंबडे, कुत्रे, गाय-म्हशी असा जोडधंदा करतात. त्यामुळे माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखाना हा त्यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरला होता. मात्र जून २०२५ पासून या दवाखान्यात डॉक्टर व दवाखान्याचा देखभालीसाठी कर्मचारी नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दवाखान्याची संरक्षण भिंत कोसळली आहे. उपचार कक्षाचे दरवाजे तुटले आहेत तर घोड्यांवर उपचार करण्यासाठी उभारलेला स्टँडदेखील तुटला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही दुरवस्था झाली असून लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी केली आहे.
अश्वपालकांचा संताप
प्रवासी वाहतूक करणारे अश्वपालक शैलेश ढेबे यांच्या घोड्याला ‘कॉलिक’ हा पोटाचा आजार झाला होता. मात्र त्या घोड्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर उपलब्ध असते तर त्या घोड्याचा जीव वाचला असता, असा संताप यावेळी अश्वपालकांनी व्यक्त केला आहे.