माथेरानमध्ये भाजपला ‘आफ्टरशॉक’, शिवसेनेच्या तीन नगरसेविका स्वगृही परतल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माथेरानमध्ये शिवसेनेने भाजपला आज आफ्टरशॉक दिला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तीन नगरसेविकांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज स्वगृही परतत शिवसेनेत प्रवेश केला. सोनम दाभेकर, सुषमा जाधव आणि ज्योती सोनावळे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत माजी पदाधिकारी कुलदीप जाधव, सचिन दाभेकर यांनीही घरवापसी केल्याने माथेरानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

माथेरानमधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी 27 मे रोजी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र अवघ्या सात महिन्यांतच अनेक नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला. त्यापैकी सोनम दाभेकर, सुषमा जाधव, ज्योती सोनावळे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख राजेश कुचिक, माथेरान शहर संपर्कप्रमुख आकाश सावंत, कर्जतचे युवासेना सचिव प्रथमेश मोरे, रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, युवासेना संपर्कप्रमुख ओंकार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरानमध्ये विकासकामांसाठी कोटय़वधींचा निधी दिला असून माथेरानकरांचा शिवसेनेवरच विश्वास असल्याची प्रतिक्रिया या नगरसेवकांनी दिली. टप्प्याटप्प्याने उर्वरित नगरसेवकही शिवसेनेत पुन्हा परततील असा विश्वास व्यक्त होत आहे.