
सामना ऑनलाईन । लखनऊ
महाआघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना केला होता. त्या आरोपांना प्रत्युत्तर देत बसपा अध्यक्ष मायावती यांनी मोदींवर पलटवार केला आहे. ‘मोदी फक्त कागदोपत्रीच स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांचे काळधंदे आणि भ्रष्टाचार जनतेपासून लपलेला नाही’ असे मायावती म्हणाल्या. जनहितासाठी आणि देशहितासाठी आपण फिट आहोत आणि मोदी अनफिट आहेत, असा दावा करत मायावती यांनी थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे.
बसपा अध्यक्ष मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच शाब्दीक युद्ध सुरू आहे. त्यात जातीच्या मुद्द्यासोबतच बेनामी संपत्तीचा मुद्दाही आहे. हाच मुद्दा उचलत पंतप्रधानांनी महाआघाडीतील नेत्यांवर टीका केली होती. त्याला मायावती यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदी यांनी प्रत्युत्तर देतानाच मायावती यांनी थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. त्यामुळे मोदी यांच्या प्रत्येक आरोपाला त्या आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. आपली संपत्ती ही जनतेने आपल्याला दिलेली आहे. जनतेने दिलेल्या पै पैचा हिशोब आमच्याकडे आहे. तर बेनामी संपत्ती असलेले अनेक नेते भाजपमध्येच आहेत. त्यांचा हिशोब जनतेपासून लपलेला नाही. पंतप्रधानांनी आधी स्वतःच्या पक्षातील बेनामी संपत्ती असलेल्या नेत्यांना जाब विचारावा, त्यानंतर इतरांवर टीका करावी असे त्या म्हणाल्या. जनहितासाठी आणि देशहितासाठी कोण फिट आहे हे जनता दाखवून देईल असा दावाही त्यांनी केली. सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी यांनी मर्यादा सोडल्या आहेत. ते बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी आपण ओबीसी असल्याच्या केलेल्या खोट्या दाव्याप्रमाणेच त्यांची कारकिर्द फक्त कागदोपत्रीच स्वच्छ आहे. मोदी वास्तवात वेगळे आहेत आणि जनतेसमोर मांडण्यात येणारी त्यांची स्वच्छ प्रतिमा फसवी आहे. त्यांचे खरे हिशोब दडवले गेले आहेत. गेल्या पाच वर्षात बसपाला बदनाम करण्याचा भाजपने प्रयत्न केला.मात्र, त्यात ते अयशस्वी झाले आहेत. आमचा हिशोब स्पष्ट असून जनतेसमोर आहे. आतापर्यंत आपण चारवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. आपला कार्यकाळ पारदर्शक आणि सुशासनाचा होता. आपल्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेचे दाखले आजही देण्यात येतात. आपल्यापेक्षा जास्तवेळ मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि पंतप्रधानपदाचा कार्यकाळ म्हणजे देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाहीवरचा काळाडाग असल्याचा आरोपही मायवती यांनी केला. आमच्या कार्यकाळाची तुलना केल्यानंतर आपणच जनहितासाठी आणि देशहितासाठी फिट आहोत आणि मोदी अनफिट आहेत, हे दिसून येते असे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात द्वेषाचे राजकारण केले आहे. धार्मिक आणि जातीय तणाव त्यांच्यामुळे वाढला आहे. मागासांचा कधीही विकास होऊ नये, मागास वर्ग श्रीमंत होऊ नये यासाठी मोदी धेरण राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेने मोदी यांचे खरे स्वरूप ओळखले असून जनता परिवर्तन घडवणार आहे, असे त्या म्हणाल्या.
























































