
गुजरात सायन्स सेंटरमधील पेंग्विन कक्ष, देखभाल आणि इतर बाबींची वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षाशी तुलना केली तर महापालिकेवर विरोधक करत असलेले आरोप बिनबुडाचे ठरतील. तेव्हा आरोप करण्याआधी त्यांनी चांगला अभ्यास करावा, विरोधकांचे गणित कच्चे आहे. त्यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यावे, तिथे दर्जेदार शिक्षण मिळते, अशी सडकून टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केली.
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ‘व्हर्च्युअली व्हाईल्ड’ या मालिकेत सफरीच्या तिसऱया भागाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांना उत्तर देताना महापौर म्हणाल्या, भायखळ्याच्या उद्यानात 17.50 कोटींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेंग्विन पार्क उभे केले आहे. हे उद्यान आणि कक्ष एकाच तिकिटात बघता येते. मुंबईकरांसाठी ही परवडणारी पर्वणी आहे. अहमदाबादमध्ये 257 कोटी खर्च करून पेंग्विन पार्क उभे केले आहे. गुजरात आणि मुंबईच्या पार्कमध्ये फरक आहे.यावेळी बाजार व उद्यान समिती अध्यक्ष प्रतिमा खोपडे, नगरसेवक रमाकांत रहाटे, उपायुक्त रमाकांत बिरादार, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी उपस्थित होते.


























































