….तर त्यांनी अदानीचा खजिना लुटून जनतेत वाटला असता; मेधा पाटकर यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आदिवासी समाजातील क्रांतीकारक तंट्या भिल यांचे उदाहरण देत अदानी यांच्या प्रकरणावर मत व्यक्त केले. तंट्या भिल आज जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा खजाना लुटला असता आणि जनतेत वाटला असता, असे त्या म्हणाल्या. देशातील जल, जंगल, जमीन, खनिज संपत्ती लुटली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या पुण्यात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या (महाराष्ट्र) अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.

मेधा पाटकर म्हणाल्या, सध्या बिरसा मुंड्या, तंट्या भिल आणि सरदार पटेल यांचे पुतळे उभारले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात सरदार पटेल यांचा पुतळा उभा करताना 72 गावे उठवण्यात आली. त्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचा मोबदला देखील देण्यात आला नाही, हे मोदींचे राज्य आहे. तंट्या भिल ब्रिटिशांचा खजाना लुटून गरीबांमध्ये वाटतं होता. आज तंट्या भिल जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा खजाना लुटला असता आणि गरीबांमध्ये वाटला असता, असे त्या म्हणाल्या.

देशातील जल, जंगल, जमीन, खनिज संपत्ती हे सगळे लुटले जात आहे. या लुटीतून हे सर्व उद्ध्वस्त केलं जात आहे. या विनाशात केवळ घरच नाही, तर त्या लोकांचे उपजीविकेचे साधनही हिरावून घेतले जात आहे. त्यांना काही लाभ देण्याचं आश्वासन दिलं जातं आणि विस्थापित केलं जातं. यावर जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय काम करत आहे, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.

मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, आज प्रत्येक ठिकाणी जनता असमाधानी आहे. आपल्या हातातील शेती, जंगल, नदी, भुजल वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, आपण विकासाच्या नावाखाली सब का साथ, सब का विकास म्हणत संसाधनं उपभोगत आहोत आणि त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत. विस्थापन हा एक परिणाम आहे, तर नर्मदेसह प्रत्येक नदी रडत आहे. पृथ्वी जळते आहे, जंगल संपत चालले आहेत, मग नदी 12 महिने कशी वाहणं शक्य आहे, असा सवालही त्यांनी केला.

अविरल और निर्मल बहने दो, असं म्हणत गंगेच्या काठावरील साधुसंतांनी आपले जीव गमावले आहेत. एक नव्हे, तर पाच जणांनी जीव गमावले. आज गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी गोळ करणं, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेणे आणि निधीची विल्हेवाट लावणे, यातून भविष्याचीही विल्हेवाट लावली जात आहे. सर्वाच नद्यांची अशी स्थिती आहे, मात्र, सर्वात दुर्दैवी स्थिती यमुना नदीची आहे. प्रत्येक नदीत वाळू उत्खनन सुरू आहे. नदीत भर घातली जात आहे, असे त्यांनी सांगितले.