
डॉक्टर होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना खूशखबर आहे. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा हजारोंच्या संख्येने वाढवण्यात येणार आहेत. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) प्रशासकीय मंडळाने त्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
एमसीआयच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. गेल्या पाच वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा जितक्या संख्येने वाढवल्या गेल्या त्यापेक्षा जास्त जागा यंदाच्या वर्षात वाढवल्या जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.
2024 पर्यंत पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा दुपटीने वाढवण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. 2014-15 पर्यंत सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण जागा 23 हजार होत्या. यंदाच्या 2020-21 वर्षापासून एमडी आणि एमएस या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या 4801 जागा वाढवण्यास एमसीआयने परवानगी दिली आहे. या वाढीनंतर एमडी, एमएसच्या एकूण जागा आता 36 हजार 192 होणार आहेत, असे पॉल यांनी सांगितले.





























































