
सामना प्रतिनिधी । बीड
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी असे आईचे महत्व पटवून देणारी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. भावाच्या जन्मासाठी आपल्या आईने प्राण सोडलेल्या तब्बल सात मुली आज आईविना पोरक्या झाल्या. भयभीत आणि आसुसलेल्या नजरेने आपली आई केव्हा परत येणार हा प्रश्न घेऊन एकमेकींना आधार देत आहेत. मोठी मुलगी चौदा वर्षाची तर सर्वात लहान मुलगी दीड वर्षाची आहे.
माजलगाव येथील एखंडे कुटुंबातील मीरा एखंडे यांचा शुक्रवारी दहाव्या प्रसुतीमध्ये रक्तस्त्राव झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. सात मुलीनंतर आता तरी मुलगा होईल या अपेक्षेने त्या गर्भवती राहिल्या. सुदैवाने मुलगा जन्मला. मात्र दुर्देवाने अवघ्या काही क्षणात त्या बाळाचा आणि मातेचा करून अंत झाला. मिरा एखंडे यांच्या मृत्यूने कुटुंबातील सात मुली आज आईविना पोरक्या झाल्या. या मुलींना मानसिक आधाराची गरज आहे. मोठी मुलगी चौदा वर्षाची असली तरी त्यानंतरच्या सहा मुली मात्र वयाने फार लहान आहेत. आईच्या निधनाने या मुली आज आईच्या प्रेमाला मुकल्या आहेत. अत्यंत साधारण परिस्थिती असणार्या एखंडे कुटुंबावर नियतीने घाला घातला. सात मुलीच्या भविष्यासाठी त्यांना मानसिक आधार आणि आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे.





















































