मराठा आरक्षणासाठी गाठीभेटी, सल्लामसलती; विशेष अधिवेशनाची मागणी, सुपर न्यूमररीचा वापर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज दिवसभर भेटीगाठी आणि सल्लामसलती सुरु होत्या. मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे यांची पुण्यात संयुक्त बैठक झाली, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली, तर राज्य सरकारने सुपर न्यूमररीचा वापर करून मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी केली.

खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यातील औंधमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुमारे एक तास चर्चा झाली. सातारा व कोल्हापूर या दोन घराण्यांची एकत्र भेट झाली असून त्याला आपल्याला आनंदच असल्याची भावना खासदार संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, राज्याने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, केंद्राचे मी बघतो. राज्याने अधिवेशन बोलावून गायकवाड कमिशन रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करून काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालणार का असा सवाल केला. आधी अधिवेशन होऊ द्या मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसे गाठायचे ते बघतो असा इशारा त्यांनी दिला. भाजप नेत्यांच्या टिकेसंबंधी विचारण्यात आले असता, उदयनराजे म्हणाले, पाच बोटं जशी सारखी नसतात तसं प्रत्येकाचं वेगळं मत असू शकते. माझी मूल्ये वेगळी आहेत. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणारा माणूस आहे. कायदा वगैरे मी मानत नाही. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गायकवाड कमिशनचा अहवालच वाचलेला नाही, हा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे, असेही ते म्हणाले.

मागण्यांचा पुनरुच्चार

खासदार संभाजीराजे यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरीबांना मिळणे, जिह्यात वसतीगृह, 2 हजार 185 विद्यार्थ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तात्काळ कराव्या. सर्वोच्य न्यायालयाने सरकारला केलेल्या सुचनांनुसार राज्य सरकार सुपर न्यूमररीचा वापर करण्यास मोकळे असून तीपध्दत शिक्षणात वापरण्यात यावी अशी आमची मागणी आहे.  संभाजीराजे  यांनी या प्रश्नावर 16 जूनपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची होती. खासदार उदयनराजे यांनी यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

अजित पवार व छत्रपती शाहू महाराज भेट

कोल्हापूरमधील न्यू पॅलेस येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा झाली. या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली असे सांगून अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा मांडला होता. आरक्षणाच्या संदर्भात विधेयक आणून  कायदा करावा अशी विनंती करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली. या चर्चेनंतर शाहू महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सर्वांनी पूर्ण अभ्यास करायला हवा. तो निकाल सर्वांनी समजून घेतला पाहिजे. न्यायालयाचा अवमान होणार नाही हे पहावे. तसेच जे जे शक्य असेल ते केले पाहिजे. काय शक्य आहे ते पण सांगितले पाहिजे. मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात निकाल झालेला आहे. आता समाजाच्या ज्या काही चार-पाच प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी निश्चितच राज्य सरकारचे सकारात्मक आहे. यापुढेही राज्य सरकारचे अधिक लक्ष राहणार आहे. मात्र, उद्या तुम्ही चंद्र-सूर्य आणून द्या असे म्हटले तर ते कसे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण केंद्र सरकारच्या हातात नाही; तर राज्य सरकारच्या हातात असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, शाहू महाराज म्हणाले, मी कायदेपंडित नाही. कायद्यात काय बसते हे काही माहित नाही. पण केंद्रामध्ये त्यांच्या पक्षाचे बहुमत असल्याकडे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी लक्ष वेधले.

केंद्राने घटनात्मक बदल करून पुढचे पाऊल टाकावे – श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

मराठा समाजासाठी जे शक्य आहे ते सर्व करण्याकरिता राज्य सरकार निश्चितच सकारात्मक आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने लक्ष दिले तर आणि केंद्राला या विषयात रस असेल तर घटनात्मक बदल करून पुढचे पाऊल टाकायला हवे, असे स्पष्ट मत आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.