
स्त्री किंवा पुरुष .. कोणाचेही पोट सुटणे ही स्थूलपणाची एक मोठी समस्या आहे. दोघांच्याही बाबतीत, विशेषत: पुरुषांच्या बाबतीत हा नेहमी चेष्ठेचा विषय होतो.
मापाचे कपडे मिळत नाही, चालल्यावर धाप लागते, दोन मजले चढायचे असले तरी त्रास होतो.याचबरोबर सुटलेल्या पोटामुळे हृदयविकार, मधुमेह, अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. सध्याची जीवनशैली, बैठं काम, खाण्याचं अनियमित वेळापत्रक अशा अनेक कारणांमुळे पोट सुटायला सुरुवात होते आणि ते कमी करणं जिकिरीचं होऊन बसतं.
1) पोट का सुटतं?
पोट सुटण्याची अनेक कारणं आहेत. चरबी वाढली की पोट सुटतं हे इतकं साधं आहे. मद्यसेवनाचं प्रमाण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं. तसंच बाहेर खाण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पुरुषांमध्येपोटावर चरबी जास्त प्रमाणात वाढते. पुरुषांचं असो किंवा बायकांचं असो, जास्त खाल्ल्याने पोट सुटतं व्यायाम न करणे हे दुसरं कारण आहे. वारंवार खाणे हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे . वारंवार खाल्ल्याममुळे इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं. त्याची पातळी वाढली की वजन वाढतं.
खाण्याची उपलब्धता हे पोट वाढण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे . लोकांची खाद्यपदार्थ खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे आणि वारंवार खाणं हा पोट सुटण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. चालणं कमी झालं आहे. तसंच स्मार्टफोनवर स्विगी, झोमॅटो असल्याने लगेच हवं ते हवं तेव्हा खायला मिळतं. हे पोट सुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे.
2) पोट सुटण्याचं वय नेमकं काय असतं?
पोट सुटण्याचं नेमकं वय नसतं. विशीत ते फारसं दिसत नाही. कारण या वयोगटातले लोक तसे आरोग्याबद्दल सजग असतात त्यामुळे त्यांच्यात ही समस्या फारशी दिसत नाही. पस्तिशी चाळीशीत ही समस्या दिसते. कारण आयुष्य स्थिरस्थावर झालेलं असतं, शारीरिक हालचालही कमी होते. व्यावसायिक ताणतणाव असल्याने पोटाचा घेर वाढतो .
3) पोटाचा घेर ही समस्या आहे हे कसं ओळखावं?
पोटाचा घेर ही समस्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कमरेचा घेर मोजावा. पुरुषांच्या कमरेचा घेर 94 सेमी पेक्षा जास्त असेल तर ही नक्कीच मोठी समस्या आहे असं समजावं.
4) पोट सुटण्यासाठी हानिकारक खाद्यपदार्थ आणि द्रव्यपदार्थ कोणते?
पोट सुटण्यासाठी सगळ्यात जास्त हानिकारक पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, एकूणच फॅट असलेले पदार्थ पोट सुटण्यासाठी जबाबदार असतात. त्याचबरोबर तळलेले पदार्थ, रिच डेझर्ट, गोड पदार्थ आणि फायबर कमी असलेले पदार्थ यामुळे वजन वाढतं .अल्कोहोल सुद्धा पोट सुटण्यासाठी जबाबदार आहे. जोपर्यंत अल्कोहोलचा शेवटचा थेंब तुमच्या शरीरातून जात नाही तोपर्यंत शरीर तिथून फॅट घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे वजन वाढतं. अल्कोहोल सेवन करताना जे खाद्यपदार्थ असतात तेही पोट सुटण्यासाठी तितकेच जबाबदार असतात .
बीअरमुळे पोट सुटतं असाही एक समज आहे. पण तुम्ही किती पिता यावर ते अवलंबून आहे. कधीतरी घेतली तर फार पोट सुटत नाही पण आठवड्यातून तीनदा वगैरे घेतली तर नक्कीच वजन वाढतं. नॉन अल्कोहोलिक द्रव्यपदार्थात चहा आणि कॉफी सर्वांत जास्त हानिकारक आहेत .दारू पेक्षाही दारूबरोबर असलेले खाद्यपदार्थ पोट सुटण्यासाठी जास्त जबाबदार असतात . कारण दारू पिताना खाण्याचं भान राहत नाही. बराच वेळ खाल्लं जातं
5) भात कमी खाल्ल्याने पोट कमी होतं का?
पोट कमी करायचं असेल तर भात खाणं कमी करा असा सल्ला सरसकट दिला जातो. मात्र दक्षिण भारतात भात जास्त खाल्ला जातो, तिथे लोकांचे पोट सुटलेले असतात आणि उत्तर भारतात लोक गहू जास्त खातात तिथेही लोकांची पोटं सुटलेली असतात त्यामुळे तुम्ही किती वेळा खाता आणि किती खाता यावर सगळं अवलंबून आहे
भाताची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की त्यात फायबर कमी आणि कर्बोदके जास्त असतात. त्यामुळे भात किती खाता आणि कसा खाता यावरही सगळं अवलंबून असतं. भाताबरोबर भाज्या, इतर सॅलड किती खाता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. भाताबरोबर इतर गोष्टी खाल्ल्या तर वजन वाढत नाही.
6. पोट कमी करण्यासाठी जिमला जायलाच हवं का?
व्यायाम करणे हे प्रत्येकासाठीच आरोग्यदायी असते. नियमित चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. पण तो संपूर्ण व्यायाम होऊ शकत नाही. संपूर्ण शरीराला व्यायाम होणे आवश्यक असते. आणि व्यायाम नेहमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यामुळे व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे यात कमीपणा काहीच नाही. उलट तो प्रत्येकाने केला पाहिजे. 24 तासात व्यायाम करण्यासाठी एक तास नक्की देता येतो . प्रत्येकाचा प्राधान्यक्रम काय आहे हाही एक महत्त्वाचा भाग आहे .
7.कमी खाल्ल्याने पोट कमी होतं?
हा सगळा लाईफस्टाईलचा प्रश्न आहे. तुमच्या शरीराला किती कॅलरीज हव्यात, त्यापेक्षा थोड्या कमी कॅलरीज घेतल्या तर फॅट कमी होतं. त्यामुळे कमी खाण्यापेक्षा काय खातोय आणि किती खातोय हे जास्त महत्त्वाचं आहे .
8. ढेकर दिल्याने पोट कमी होतं का?
हसू आलं ना? पोट कमी करण्याबद्दल लोकांनी हा प्रश्न गुगलवर विचारला आहे. पण ढेकर फक्त तृप्तीची देता येते. कारण असं करता आलं असतं तर सगळंच किती सोपं होतं ना?. ढेकरा दिल्याने पोट कमी होत नाही असं आहारातज्ज्ञ एकमुखाने सांगतात. त्यामुळे पुढच्या वेळेला जेवण झाल्यानंतर ढेकर दिली तर फक्त समाधान वाटेल वजन कमी होणार नाही.
9. पोट कमी करण्यासाठी करावं तरी काय?
डाएट करताना पोटावरचं फॅट कमी करणं फार कठीण आहे. कर्बोदके कमी असलेले खाद्यपदार्थ खाल्लं तर वजन झपाट्याने कमी होतं. पोट कमी करण्यासाठी हेल्दी खाण्याचा प्लॅन तयार करावा .शरीराची सातत्याने हालचाल हाही पोटाचा घेर कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे पोट कमी करायचं असेल तर रोज अर्धा ते एक तास व्यायाम करायला हवा. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्यातून हद्दपार करायला हवेत. अल्कोहोलचं सेवन कमी करायला हवं, तसंच धुम्रपान तातडीने सोडायला हवं. सरतेशेवटी कमरेचा घेर 40 च्या आत असायलाच हवा हे पुरुषांनी लक्षात ठेवायला हवं. तरच पोटाच्या घेराची चिंता तुम्हाला सतावणार नाही.





























































