
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत दै. ‘सामना’च्या ज्वलंत अग्रलेखांची व बातम्यांचीच चर्चा होती. अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दै. ‘सामना’च्या अग्रलेखांचे वाचन केले. ‘सामना’च्या अग्रलेखांचा दाखला देत तुम्ही मागील चार वर्षांच्या कारभाराचे प्रमाणपत्र नव्हे तर मानपत्र तुमच्या मित्रपक्षाने दिले आहे, असा टोला विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारला.
अंतिम प्रस्तावावर भाषण करताना विखे-पाटील यांनी दै. ‘सामना’च्या गाजलेल्या अग्रलेखांची कात्रणे सोबत आणली होती. कर्नाटक निवडणुकीपासून शेतकरी कर्जमाफी, शिवस्मारक आणि अवनी वाघिणीच्या एन्काऊंटरनंतर लिहिलेल्या ‘अवनी आम्हाला माफ कर’ अशा अग्रलेखांचा भाषणात उल्लेख केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘चलो अयोध्या’ आणि ‘पहले मंदिर, फिर सरकार’ या घोषणांचा उल्लेख करीत तुमच्या मित्रपक्षाने अयोध्या वारीने तुमच्यावर कुरघोडी केल्याचे मुख्यमंत्र्यांना सुनावले.
मिठीपर्यंत येऊ द्या!
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर केलेल्या आरतीचा उल्लेख विखे-पाटील यांनी त्यांच्या भाषणात केला तेव्हा अस्वस्थ झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि शरयू नदीवरून आता मिठी (नदी)पर्यंत या, असे ते विखे-पाटलांना म्हणाले.
बापट अस्वस्थ झाले
संसदीय कार्यमंत्री गिरीश बापटही मध्येच उभे राहून म्हणाले की, विखे-पाटील हे ‘सामना’चे संपादक आहेत, वार्ताहर आहेत की रीडर आहेत? आम्हाला सर्व अग्रलेख का वाचून दाखवतात?
सुनील प्रभूंनी घेतला आक्षेप
विखे-पाटील यांच्या भाषणातील काही मुद्यांवर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी हरकत घेतली. विरोधी पक्षनेते ‘सामना’तील दाखले देत आहेत पण जे छापून आले नाही ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी टाकत आहेत. ते छापून आले असेल तर वर्तमानपत्राची कात्रणे पटलावर ठेवावीत, असे आवाहन केले.
मानपत्र दिले आहे…
‘सामना’च्या अग्रलेखांच्या वाचनाने अस्वस्थ झालेले भाजपचे अनेक आमदार हे विखे-पाटील यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावर तुमचा एवढा उद्रेक का, मागील चार वर्षांत सरकारचा कारभार कसा चालला आहे त्याचे प्रगतिपुस्तक ‘सामना’ने मांडले आहे. सरकारच्या कारभाराचे प्रमाणपत्र नव्हे तर मानपत्रच दिले आहे. ते वाचताना मला गहिवरून आले असे विखे-पाटील म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे दै. ‘सामना’मधील कात्रणही विखे-पाटील यांनी सभागृहात उंचावून दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनीही ‘सामना’च्या अग्रलेखांचा उल्लेख केला.




























































