मेटल डिटेक्टर डोअर झाले इनऍक्शन, रेल्वे स्थानकांच्या बंदोबस्तात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी सीएसएमटी स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या अतिरेकी हल्ल्याला दहा वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दुर्दैवाने अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफने कमांडोच्या दोन कंपन्या तैनात केल्या आहेत.

पश्चिम रेल्वेने 125 कमांडोंना फोर्स वनच्या पथकाद्वारे प्रशिक्षण दिले असून क्विक रिस्पॉन्स टीममध्ये सामील करून त्यांना संवेदनशील स्थानकांत तैनात केले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. तसेच पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर 24 तास 548 आरपीएफ कॉन्स्टेबल्स तैनात केले असून त्याच्या दिमतीला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 329 जवान आणि लोहमार्ग पोलिसांची कुमक घेण्यात आली आहे. ‘परे’च्या मुंबई डिव्हिजनमध्ये 1128 सीसीटीव्हींचा पहारा असून आरपीएफचे तज्ञ त्याची 24 तास निगराणी करीत आहेत. सप्टेंबरपासून चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि सुरत स्थानकात पाच बॅगेज स्कॅनर मशीन बसविण्यात आल्या असून दिवसाला 8500 बॅगांची तपासणी केली जात आहे. बॉम्बशोधक व नाशक उपकरणासह पाच जणांचे पथक कार्यरत असून दहा प्रशिक्षित डॉगचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. आरपीएफची 182 हेल्पलाइन अधिक सक्षम करण्यात आली आहे.

2008 मधील हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थादेखील चोख करण्यात आली. पण वर्षांमागून वर्ष लोटत गेली तसे केवळ ‘26/11’ जवळ आली की सुरक्षेच्या दृष्टीने काही तरी केल्याचे चित्र निर्माण केले जाते. सीएसएमटी स्थानकावर त्याचे ज्वलंत उदाहरण बघायला मिळत आहे. ‘26/11’ जवळ आले आहे. त्यामुळे प्रत्येक सुरक्षा यंत्रणा आपण कशा प्रकारे सज्ज आहोत, कुठलेही संकट परतवून लावण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. पण ‘26/11’ हा दिवस निघून गेला की पुन्हा चित्र वेगळे दिसते. सीएसएमटी स्थानकात पूर्वी प्रत्येक गेटवर मेटल डिटेक्टर डोअर लावण्यात आले होते. तसेच रेल्वे पोलीस व आरपीएफकडून संशयित व्यक्तींच्या सामानाची हॅण्ड मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जात होती. सुरुवातीचे काही वर्षे हे चित्र पाहायला मिळाले, पण गेल्या चार-पाच वर्षांत हे चित्र पालटले आणि ‘26/11’ आले की मेटल डिटेक्टर डोअर ठेवायचे, गस्त वाढवायची, सरप्राइज तपासणी करायची असे प्रकार सुरू होतात. गेल्या चार दिवसांपर्यंत स्थानकात दोन ते तीन मेटल डिटेक्टर डोअर दिसत होते. आता दोन दिवसांपासून स्थानकातील प्रत्येक गेटवर मेटल डिटेक्टर डोअर उभे केल्याचे दिसत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हा तर देखावा वाटतो
स्थानकांमध्ये मेटल डिटेक्टर डोअर प्रत्येक गेटवर उभे केले आहेत. ‘26/11’च्या निमित्ताने का असावे पण केले आहेत, परंतु हे मेटल डिटेक्टर म्हणजे देखावा वाटतो. कारण गेट व त्या डोअरमध्ये बरेच अंतर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून न जाता त्याच्या बाजूने सहज जाता येते. असे असेल तर त्या डोअरचा उपयोगच काय, असा सवाल उपस्थित करीत स्थानकात पाहिले तर डोअरच्या बाजूनेच प्रवासी जास्त करून ये-जा करतात. त्यामुळे हा केवळ देखावा असल्याची खंत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

जुन्या ब़ोटींमधून खोल समुद्रात गस्त घालण्याची भीती वाटते

दहा वर्षांनंतर सुरक्षेचा आढावा घेता चित्र तितकेसे चांगले नसल्याचे वास्तव आहे. उपलब्ध बोटीतून खोल समुद्रात गस्त घालायची भीती वाटते अशी पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा आहे. पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि त्याचे साथीदार समुद्रामार्गे मुंबईत घुसले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला होता. तेव्हा लगेच बोटीदेखील घेण्यात आल्या. पण आता दहा वर्षांनंतर त्या बोटींची अवस्था बरोबर नसल्याचे कर्मचारी सांगतात. एकतर बोटी जुन्या झाल्यात. त्यात त्यांचे आवश्यक ते मेंटेनन्स केले जात नाही. परिणामी त्याच अवस्थेत त्या बोटीतून समुद्रात गस्त घालावी लागते. समुद्रातील माफिया तसेच दहशतवाद्यांची घुसखोरी होऊ नये यासाठी समुद्रात गस्तीसाठी जावे लागते, पण बोटींची अवस्था पाहता खोल समुद्रात गेल्यावर बोट दगा तर देणार नाही ना अशी भीती मनात असते. त्यामुळे आता नवीन बोटी घेण्याची व त्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात.

मोठ्या बोटींची आवश्यकता
आता आहेत त्या बोटी कमकुवत बनत चालल्या आहेत. शिवाय या बोटींवर जास्त कर्मचारी घेऊन गस्त घालता येऊ शकत नाही. आमच्या सोबत सीआयएसएफ व कस्टमचीही गस्त असते. त्यांच्याकडे मोठ्या क्षमतेच्या, मोठ्या आकाराच्या बोटी आहेत. त्याच्या तुलनेत आमच्या बोटी कमकुवत आहेत. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवर दखल घेणे अत्यावश्यक आहे. उपलब्ध बोटींच्या तुलनेत जरा मोठय़ा बोटी सागरी पोलिसांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे असेही त्यांचे म्हणणे आहे.