वर्षभरापूर्वी घराचा ताबा मिळालेल्या विजेत्याकडून म्हाडाने दहा वर्षांचा मेंटेनन्स आकारला. न्याय मिळावा यासाठी विजेत्याने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यापुढे तक्रार मांडली. अखेर या विजेत्याला न्याय मिळणार असून मेंटेनन्सबाबत अभ्यास करून अशा प्रकारच्या तक्रारींसंदर्भात नियमानुसार सकारात्मक प्रस्ताव तयार करा, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले.
म्हाडा मुख्यालयात सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात हिरेन मेहता सहभागी झाले होते. हिरेन मेहता हे 2014च्या सोडतीतील लाभार्थी आहेत, प्रतीक्षा यादी कार्यान्वित झाल्याने 2023मध्ये दहिसर पूर्व येथील नक्षत्र सहकारी गृहनिर्माण संस्थेत त्यांना घराचा ताबा मिळाला. मात्र घराचा ताबा घेण्यापूर्वी त्यांच्याकडून 2014पासूनचे थकीत मेंटेनन्स आकारण्यात आले. न्याय मिळावा यासाठी त्यांनी म्हाडाच्या लोकशाही दिनात सहभागी होत घराचा ताबा ज्या तारखेपासून मिळाला तेव्हापासून मेंटेनन्स आकारावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मेंटेनन्सबाबत अशा प्रकारच्या अनेक तक्रारींसंदर्भात सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.
थकीत रकमेवर साडेसात लाख व्याज
सुरेखा काळे यांनी 2007मध्ये म्हाडाचे घर विकत घेतले. घराच्या विक्री किमतीपैकी काही रक्कम त्यांच्याकडे थकीत होती. म्हाडाने विलंब शुल्क म्हणून विक्री किमतीवर त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये व्याज आकारले. विलंब शुल्क माफ करण्याची मागणी त्यांनी केली. अधिकाऱयांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून व्याज माफ करण्याबाबत पर्याय शोधून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उपाध्यक्षांनी या वेळी दिले.