खासगी बिल्डरांच्या घरांवर अर्जदारांच्या उड्या, 20 टक्के योजनेतील 565 घरांसाठी तब्बल 73 हजार अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या 565 घरांसाठी आतापर्यंत 73,409 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका घरासाठी 130 अर्जदारांमध्ये स्पर्धा असणार आहे.

कोकण मंडळाच्या 5,285 घरांमध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे तसेच 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अगदी 9.50 लाखांपासून ते 85 लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती आहेत. 5,285 घरांसाठी शनिवारी दुपारपर्यंत तब्बल 1,14,287 अर्ज प्राप्त झाले असून 79,192 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. खासकरून अर्जदारांचा कल 20 टक्के योजनेतील घरांकडे आहे.

n ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा विविध लोकेशनवर 20 टक्के योजनेतील  घरे आहेत. यंदा पहिल्यांदाच नवी मुंबईतील घरांचाही लॉटरीत समावेश करण्यात आल्यामुळे अर्जदारांची संख्या वाढल्याची चर्चा आहे.

शेवटचे चार दिवस बाकी

घरांसाठी इच्छुक अर्जदार 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ’म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात तर 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची सोडत 18 सप्टेंबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात काढण्यात येणार आहे.

n दुसरीकडे म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधलेल्या आणि ठाणे – बोरिवली टनेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चितळसर मानपाडा येथील 869 घरांनादेखील चांगली पसंती मिळतेय. या घरांच्या किमती 52 लाख रुपये असल्या तरी कनेक्टिव्हिटी आणि लोकेशनचा फायदा या घरांना होताना दिसतोय.