‘मफतलाल’च्या जागेवर म्हाडा उभारणार 29 हजार घरे; कोर्टात लवकरच प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळव्यातील मफतलाल कंपनीची जागा विकत घेण्याची तयारी म्हाडाने दर्शवली आहे. या जागेवर 29 हजार घरे बांधणार असून तो राज्यातील सर्वात मोठा निवासी गृहसंकुल प्रकल्प ठरेल. याबाबत लवकरच कोर्टापुढे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून कामगारांची थकीत रक्कम देण्याची देखील तयारी म्हाडाने केली आहे. न्यायालयाने हा प्रस्ताव मान्य केल्यास साडेतीन हजारांहून अधिक कामगारांना न्याय मिळणार आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांना एक छदामही मिळालेला नाही. या जागेवर अतिक्रमण देखील उभे राहिले असून याबाबतचा वाद गेली अनेक वर्षे न्यायालयात आहे. सध्या मफतलालची जमीन कोटय़वधी रुपयांच्या घरात असून म्हाडा ती विकत घेईल. तसेच कामगारांना तात्काळ त्यांची देणी देणे शक्य होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोर्टाने हा प्रकल्प मान्य केला तर तिथे 29  हजार घरे बांधता येतील. शिवाय, शेजारची झोपडपट्टीही विकसित होईल. कोर्टाने तीन हिस्से करावेत.  कामगारांची देणी म्हाडा तत्काळ देईल. बुडीत गेलेले पैसे एकाच वेळी समझोत्याने निकाली काढून या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभा राहिल. या संदर्भात अडॅव्होकेट जनरल कुंभकोणींशी चर्चा झाली असून तसा प्रस्ताव ते कोर्टात मांडणार आहेत, असेही आव्हाड यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी फुटणार

कळवा, मुंब्रा, विटावा भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेला तिसरा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे न उतरविता आता तो पटनी मैदानाजवळ उतरविण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आहे. कळव्यात प्रवेश करताना खाडीपुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करुन तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच, विटाव्याच्या पुलाचे काम चार महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.