आश्वासनांची खैरात नको, आता आम्हाला घरे द्या! घरांसाठी गिरणी कामगारांचे आक्रोश आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरे द्या, गिरण्या चाळीचा विकास त्याच जागेवर झाला पाहिजे, राहिलेल्या सर्व कामगारांना घराचा फॉर्म भरण्याची संधी द्या, गिरणी कामगार म्हणून एक जरी पुरावा सापडला तरी त्या गिरणी कामगाराला घरासाठी पात्र करा, पात्रता झाली, आता ताबडतोब घरे द्या, अशा विविध मागण्यांसाठी शेकडो गिरणी कामगार मंगळवारी आझाद मैदानात धडकले. ‘घरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच आणि गिरणी चाळ संघर्ष समिती या चार कामगार संघटना आणि संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडीलकर पांडे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्नावर आक्रोश आंदोलन पुकारले. ज्या गिरणी कामगारांनी श्रम आणि कष्टाने मुंबई उभी केली त्यांना घरापासून वंचित ठेवता येणार नाही. सरकार तुमचे आहे. गावोगावी जाऊन आश्वासने काय देता? गिरणी कामगारांना घरे द्या, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला, तर गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱया शासनाचे सरकारला आता ठिकाणावर आणावे लागेल, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. सरकारी जमीन खासगी संस्थांना देण्याऐवजी गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्यावी, असे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले. हे सरकार डोळे असून आंधळे झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खऱया अर्थाने गिरणी कामगार घरांसंबंधात निर्णय घेऊन ही योजना आकाराला आणली, परंतु विद्यमान सरकार फक्त आयत्या पिठावर रेघोटय़ा मारीत असल्याचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर म्हणाले.

माथाडी कामगार नेते-आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे नेते भाई जगताप, एसटी कामगार नेते श्रीरंग बरगे, इंटकचे अनिल गणाचार्य यांच्यासह गोविंदराव मोहिते, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, निवृत्ती देसाई, जयवंत गावडे, राजन लाड, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी काळे, किरण गावडे, उत्तम गीते, अर्चना दिकले उपस्थित होते.

मुंबईतील एनटीसी व खासगी गिरण्यांच्या जागेवर गिरण्यांची पुनर्बांधणी करून कामगार आणि रहिवाशांना तेथे घरे द्यावी. येथील अधिकची घरे गिरणी कामगार घरकुल योजनेतील कामगारांना प्राधान्याने द्यावी तसेच बीडीडी चाळ, मिठागरांची जमीन, एनटीसी गिरण्यांच्या रिक्त जागा तसेच धारावी पुनर्वसनातील जागा गिरणी कामगारांना घरांसाठी देण्यात याव्यात, अशा मागण्यादेखील यावेळी गिरणी कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.