
केंद्र सरकारने ट्विटर आणि यू-ट्यूबवर ‘बीबीसी’च्या ‘इंडिया- द मोदी क्वेश्चन’ ही डॉक्युमेंटरी ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर केरळमधील अनेक राजकीय गटांनी घोषणा केली की ते ही डॉक्युमेंटरी राज्यात प्रदर्शित करतील. यामुळे केरळमधील भाजपचे नेते संतापले असून त्यांनी याविरोधात मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना हस्तक्षेप करून असे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2002 च्या गुजरात दंगलीबाबत जगप्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने ‘इंडिया- द मोदी क्वेश्चन’ ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केल्यामुळे केंद्र सरकार व भाजपने आक्षेप घेतला. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी झाली असून, डॉक्युमेंटरी हटविण्यात आली आहे.
सीपीआय(एम) च्या युवा शाखा डीवायएफआयने फेसबुक पेजवर जाहीर केले आहे की ‘बीबीसी’च्या ‘इंडिया- द मोदी क्वेश्चन’ या डॉक्युमेंटरीचे शो दाखवले जातील. त्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले आहे.
एसएफआय – सीपीआय(एम) सह युती असलेली डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) च्या विविध शाखांनी, युवक काँग्रेससह अशाच घोषणा केल्या आहेत. केरळमधील एका महाविद्यालयात याचं स्क्रीनिंग करण्यात आलं असून त्यावरून भाजप आक्रमक झालं आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (KPCC) अल्पसंख्याक सेलने असेही म्हटले आहे की प्रजासत्ताक दिनी राज्याच्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली जाईल.
भाजपने अशा कृतीला ‘देशद्रोह’ म्हणून संबोधले आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने हस्तक्षेप करून अशा प्रयत्नांना आळा घालण्यास सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी विजयन यांच्याकडे तक्रार दाखल करून राज्यात माहितीपट प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
सुरेंद्रन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या परकीय हालचालींना साथ देण्यासारखेच आहे.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनीही मुख्यमंत्र्यांना डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला परवानगी देऊ नये असे आवाहन केले आणि त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
एका फेसबुक पोस्टमध्ये मुरलीधरन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आरोपांचा पुन्हा परिचय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.