
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानने केलेल्या ‘हवाई स्ट्राईक’मध्ये 250 दहशतवादी ठार झाले हा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलेला अंदाज आहे, असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले.
लक्ष्यभेद करणे हे आमचे काम आहे. हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले हे मोजणे आमचे काम नव्हे. याचा आकडा सांगणे सरकारचे काम आहे, असे हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी सोमवारी स्पष्ट केले होते. तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 250 दहशतवाद्यांचा खात्मा झाला, असे म्हटले आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता व्ही.के. सिंह म्हणाले, ‘हवाई स्ट्राईक’ वेळी इमारतींमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरून किती जण ठार झाले याचा हा आकडा आहे. हा अंदाज आहे. अमित शहा यांनीही अंदाज सांगितला आहे. ठोस कन्फर्म आकडा नाही. अनेक दहशतवादी ठार झाले असेच शहा यांनी म्हटलेले आहे.






























































