साताऱ्यातील हॉटेलमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे, हॉटेलचालकासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहरानजीक बोगदा ते शेंद्रे जाणाऱ्या रस्त्याकर असलेल्या किनारा हॉटेलवर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अल्पवयीन दोन मुली व दोन मुले अश्लील चाळे करताना पोलिसांना आढळून आले. या गैरकृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेलचालकासह दोन अल्पवयीन मुलांवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर असलेल्या किनारा हॉटेलमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक कारवाईसाठी पाठवले. दुपारी दीड वाजता पोलिसांनी किनारा हॉटेलवर छापा टाकला. यावेळी दोन मुले आणि दोन मुली एका खोलीमध्ये अश्लील चाळे करताना पोलिसांना सापडले. यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. ही मुले अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही हॉटेलचालक आकाश सुरेश माने (वय 32, रा. डबेकाडी, ता. सातारा) याने हॉटेलमध्ये बंदिस्त रूम उपलब्ध करून दिली. तसेच, अल्पवयीन मुलींसोबत एकांत मिळावा व लैंगिक कृतींना प्रोत्साहन दिले, तर दोन अल्पवयीन मुलांनी संबंधित पीडित मुलींशी शारीरिक लगट केली. या प्रकारामुळे पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक समीर महांगडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलींना वाममार्गाला लावणाऱ्या संबंधित मुलांवर वास्तविक मुलींच्या पालकांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र, पालक पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पालक या नात्याने फिर्याद दिली. यापुढे जिल्ह्यात असे गैरप्रकार कोणत्याही हॉटेलमध्ये सुरू असतील, तर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सातारा तालुका पोलिसांनी केले आहे.