
मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून (दि. 22) पुन्हा नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरज (मिरज सिव्हिल) हे कोविड रुग्णालय म्हणून मार्च 2020 पासून कार्यरत आहे. असंख्य कोविड बाधित रुग्णांवर येथे यशस्वी उपचार करण्यात आले. डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱयांनी अविरत परिश्रमाने रुग्णसेवा देऊन रुग्णालयाचा नावलौकिक कायम राखला. सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या रुग्णालयात नॉन कोविड रुग्णसेवा परत सुरू करण्याची जनतेची मागणी आहे व गरजही आहे. शासनाचे धोरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सोमवार (दि. 22) पासून मिरज सिव्हिल येथे नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली आहे.
रुग्णालयीन विभागांच्या बाहय़रुग्ण सेवा तसेच अपघात वैद्यकीय विभाग चालू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे औषध वैद्यकशास्त्र (मेडिसिन), शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी), अस्थिव्यंग विभाग (ऑर्थोपेटिक्स), बालरोग विभाग (पिडीयॅट्रिक्स), स्त्राrरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (ओबीजीवाय) या मुख्य चिकित्सालयीन विभागांची आंतररुग्णसेवा मर्यादित प्रमाणात चालू करण्यात येत आहे.
कान नाक-घसा, नेत्र, त्वचा, मानसोपचार क्षयरोग या विभागांच्या आंतररुग्ण सेवा मात्र सांगली येथे उपलब्ध असतील. क्ष-किरण विभागाच्या सेवा या दोन्ही रुग्णालयांत पूर्वीप्रमाणेच नियमितपणे उपलब्ध असतील. सांगली सिव्हिल रुग्णालय येथे पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकारच्या नॉन कोविड रुग्णसेवा चालू राहतील. त्याचप्रमाणे मिरज सिव्हिल येथील कोविड रुग्णसेवा आवश्यक प्रमाणात पूर्वीप्रमाणेच चालू राहील. बऱयाच कालावधीनंतर या नॉन कोविड रुग्णसेवा मिरज सिव्हिलमध्ये चालू होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करून रुग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी केले आहे.

























































