
प्रज्ञा सदावर्ते, नाशिक
तरूण मुलगा म्हटला की तासनतास स्मार्टफोनवर गेम खेळत बसतो, हे घराघरातील चित्र आहे. मात्र, नाशिकच्या अठरावर्षीय ईशान अमित या कलावंताला स्मार्टफोनच्या की-पॅडमधून स्वर ऐकू येतात. नुकतेच त्याने राष्ट्रगीत आणि आता गणेशोत्सवानिमित्त श्रीगणरायाची आरती की-पॅडवर सादर करीत उभ्या महाराष्ट्राची दाद मिळविली आहे. कुठल्याही कलावंताला त्या कलेचे विश्व सर्वत्र साद घालत असते, त्याचीच अनुभूती ईशानने की-पॅडमधून घडवलेल्या स्वराविष्कारातून सर्वांना मिळत आहे.
नाशिकचे अमित देवडे आणि तन्वी अमित यांचा मुलगा ईशान हा नुकताच विज्ञान शाखेतून इयत्ता १२वी उत्तीर्ण झाला आहे. त्याचबरोबर तो नाशिकमध्येच शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. लहान वयातच त्याला स्वरज्ञान असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. कुठलेही वाद्य त्याला आकर्षित करीत आले आहे. अनेक वर्षांपासून तो स्मार्टफोनच्या की-पॅडमध्ये स्वर ऐकू येतात असे म्हणत होता. लॉकडाऊनच्या काळात संगीतविश्वात रमलेल्या ईशानने या की-पॅडवर लक्ष केंद्रित केले. त्याला पियानो, सिंथेसायझरचे नोटेशन माहीत होते. की-पॅडवर सहा स्वर असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने मागील महिन्यात त्यावर राष्ट्रगीत सादर केले, त्याच्या इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओने सर्वांचीच मने जिंकली. अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. आता त्याने श्रीगणरायाची ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती सादर केली आहे. उद्या शनिवारी घरोघरी प्रतिष्ठापना होणार्या श्रीगणेशाची या अनोख्या पद्धतीने तो आरती करणार आहे. श्रीगणरायाला एका कलावंताने अनोख्या स्वराविष्कारातून हे वंदन केले आहे, हे खूप आनंददायी आहे.
लहानपणीच संगीत भेटले
मस्कत येथे असताना ईशान अडीच वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला स्वरज्ञान असल्याचे अनेकांनी सांगितले होते. कुणालाही फोन लावताना की-पॅडमधून त्याला स्वर ऐकू यायचे. आताचे सादरीकरण अनुभवल्यानंतर त्याचे खूपच कौतुक वाटले, अशी प्रतीक्रिया त्याची आई लेखिका तन्वी अमित यांनी दिली.


























































