मुंबईत विसर्जन मिरवणुकीत 200 मोबाईल लंपास

अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी झालेल्या गर्दीत चोरट्यांनी हातसफाई केली. गिरगाव आणि लालबाग येथे 200 हून अधिक भक्तांचे मोबाईल चोरट्यांनी लांबवले. मोबाईल आणि इतर साहित्य चोरीची तक्रार देण्यासाठी नागरिकांनी डी. बी. मार्ग आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात गर्दी केल्याचे चित्र होते. पोलिसांनी आतापर्यंत 20हून अधिक गुन्हे नोंद केल्याचे समजते. शहरातील विविध गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकांमध्ये 60 पेक्षा अधिक चोरीच्या तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करून मोबाईल चोरणाऱ्या 8 आणि सोनसाखळी चोरणाऱ्या 6 जणांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भक्तांचे 6 लाखांचे दागिने लांबवले

गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने 12 भक्तांचे एकूण 6 लाख रुपये किमतीचे दागिने लांबवले आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण हे विसर्जन मिरवणूक पाहण्यास येत असतात तर चोरीचे प्रकार होऊ नये म्हणून पोलीसदेखील खबरदारी घेत असतात. यंदा शनिवार-रविवार जोडून आल्याने भक्तांनी मोठ्या प्रमाणात लालबाग परिसरात गर्दी केली होती. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला.