मोबाईल तिकीट काढण्यात ठाणेकर स्मार्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलच्या तिकिटांसाठी बुकिंग खिडक्यांसमोरच्या रांगा अजूनही कमी झाल्या नसल्या तरी मोबाईल ऍपवरून तिकीट काढण्यात आता हळूहळू प्रवासी सरावले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर यूटीएस मोबाईल ऍपवरून दर दिवशी 75 हजारपेक्षा जास्त तिकिटांची विक्री होत असून ठाणेकर ई-तिकीट काढण्यात स्मार्ट ठरले आहेत. त्यानंतर ऐरोली, सीएसएमटी, कल्याणच्या प्रवाशांचा क्रमांक लागत आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मोबाईलवरून लोकलचे तिकीट काढण्याच्या योजनेचा साधारण तीन वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. सुरुवातीला ऍपमध्ये तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने अडचणी आल्या होत्या. त्या दूर करण्यात आल्या आहेत. या ऍपवर पेपरलेस आणि एटीव्हीएमवर जाऊन तिकिटाची छापील प्रत मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ठाणे स्थानकात दररोज सरासरी चार हजार तिकिटांची विक्री होत आहे. ठाण्यात तिकीट खिडक्या, जेटीबीएस आणि एटीव्हीममधून काढल्या जाणाऱया एकूण 82 हजार तिकिटांपैकी सरासरी 4 हजार 587 तिकिटे ही मोबाईल यूटीएस ऍपमधून काढली जात आहेत. त्यापाठोपाठ ऐरोली स्थानकातून दररोज विविध प्रकारे एकूण 15 हजार 729 तिकिटे काढली जातात. यात 2 हजार 104 तिकिटे ही मोबाईल ऍपमधून काढली जात आहेत. तर सीएसएमटी स्थानकातून दररोज 1 हजार 970 तिकिटे मोबाईल ऍपमधून काढली जात आहेत.

अजूनही तांत्रिक अडचणी
मोबाईल ऍपवर काही वेळा तिकीट काढताना नेटवर्कची समस्या येते आणि मध्येच संपर्क तुटतो. त्यामुळे तिकिटाचे पैसे खात्यातून जातात; मात्र तिकीट उपलब्ध होत नाही. 24 तासांत किंवा तीन ते सात दिवसांत पुन्हा पैसे प्रवाशांच्या खात्यात जमा होतात. मात्र याचा प्रवाशांना मनस्तापही होतो.

– मध्य रेल्वेवर काढल्या जाणाऱया विविध प्रकारच्या तिकीट सुविधांमध्ये मोबाईल ऍप तिकीट सेवेचे प्रमाण हे सरासरी 6.50 टक्के आहे. 2018 मध्ये हेच प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत होते. आता त्यात वाढ झाली आहे. उपनगरीय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम तसेच जनसाधारण तिकीट सेवक उपलब्ध आहेत.

तिकीट सुविधा व टक्केवारीचे प्रमाण
तिकीट खिडक्या 56 टक्के
एटीव्हीएम 25 टक्के
जेटीबीएस 12 टक्के

मध्य रेल्वेवरील इतर स्थानकांतील दररोजची मोबाईल तिकीट विक्री
कल्याण -1681
कुर्ला-1587
डोंबिवली -1683
वाशी -1,331
बेलापूर – 924