
नमिता वारणकर
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. यासाठी वाचनसंस्कृती टिकायला हवी. आणि तरुणांमध्ये वाचनाची ओढ निर्माण व्हायला हवी. वाचकाचे वाचनाशी नाते घट्ट व्हावे याकरिता ग्रंथसंग्रहालयेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागली आहेत. बऱयाच ग्रंथालयांतील पुस्तकांचे हल्ली डिजिटलायझेशन केलेले असते. शिवाय व्हॉट्स ग्रुपद्वारेही ग्रंथपाल आपल्या सभासदांशी जोडलेले असतात. ‘वाचन संस्कृती’ वाढवण्याची आणि टिकवण्याची आज गरज आहे. यादृष्टीने मुंबईतील ग्रंथालयांचा घेतलेला हा आढावा.
माहीम सार्वजनिक वाचनालय, माहीम
या वाचनालयातर्फे ‘फिल्मालय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या विषयांवरील डॉक्यमेंटरी फिल्म दाखवल्या जातात. एका पुस्तकाचं अभिवाचन करून त्यावर चर्चा केली जाते. यानिमित्ताने सभासद एकत्र भेटतात. महिन्याभरात त्यांची वाचलेल्या पुस्तकातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसाठी निबंध स्पर्धा, मोठय़ांसाठी दिवाळी अंक वाचन स्पर्धा भरवल्या जातात. वाचन वाढावे म्हणून शब्दकोडे स्पर्धाही घेतली जाते. शिवाय या वाचनालयातर्फे ‘घरपोच पुस्तक पुरवण्याची सेवा’ सभासदांना दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, ज्यांना पुस्तक बदलण्यासाठी वेळ मिळत नाही अशा महिला-पुरुष यांना घरबसल्या हवं ते पुस्तक उपलब्ध होतं.
ग. क. खांडेकर ग्रंथालय, मुलुंड
शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सवलतीच्या दरात त्यांना सदस्य केलं जातं. मुलांचं वाचन वाढावं यासाठी केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. लेखकांची भाषणे, चर्चासत्र, अभिवाचन, प्रवासवर्णनपर भाषणे असे उपक्रम वर्षभरात राबवले जातात. मोठय़ा वाचकांपेक्षा शाळकरी मुलांचा प्रतिसाद या ग्रंथालयाला जास्त मिळत आहे.
नॅशनल ग्रंथालय, वांद्रे
या ग्रंथालयाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. इंग्रजी, मराठी, हिंदी तसेच संदर्भ विभाग येथे आहेत. किशोरवयीन मुलांसाठी ‘बालकट्टा’ या उपक्रमाअंतर्गत पत्रकार, लेखकांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात येतं. सध्या नव्या-जुन्या पुस्तकांचं डिजिटलायझेशन सुरू आहे. ग्रंथालयाच्या वेबसाईटवरून सभासदांना हवं असलेलं पुस्तक बघता येतं. तरुण वाचकांची संख्या वाढण्यासाठी अभ्यासिका, परिक्षेसंबंधी विनामूल्य व्याख्यानमाला ठेवल्या जातात. ‘साखळी योजने’अंतर्गत पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते. यामध्ये काही पुस्तके इतर ग्रंथालयात नसतील तर त्या ग्रंथालयांना काही कालावधीसाठी ती पुस्तके दिली जातात.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, मालाड
बाल वाचन विभाग, मासिक विभाग, पुस्तक विभाग असे छोटय़ा आणि मोठय़ा वाचकांच्या सोयीकरिता या वाचनालयात विभाग करण्यात आले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतली २४ हजार पुस्तक येथे असून दरमहा वेगवेगळ्या भाषांतली शंभर मासिके वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. सभासदांना व्हॉटस् ऍप ग्रुपद्वारे कार्यक्रमांची माहिती, आमंत्रण दिले जाते. आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकाची मागणीही वाचक ग्रुपद्वारे करू शकतात. नवीन पुस्तकाची माहिती ग्रुपवर पाठवली जाते. येथील पुस्तकांचं डिजीटलायझेशन करण्यात आलंय. येथे इंग्रजी वाचकांची संख्या जास्त असून यामध्ये तरुण मुले आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे.
दादर सार्वजनिक वाचनालय, दादर
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टित मे-जून महिन्यात येथे मुलांना हवी असलेली पुस्तके दुपारी 12 ते 5 या वेळेत विनामूल्य वाचण्याची संधी दिली जाते. बालवाचक महत्त्वाचा असून तोच आपला भावी वाचक आहे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. मासिके, बालविभागासाठी नवीन पुस्तके, मुलांना कंटाळा येऊ नये याकरिता चित्रकला, हस्तकलेची पुस्तकेही येथे उपलब्ध करून दिली जातात. वाचक वाढवण्यासाठी लेखकांची भेट, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा दिन असे उपक्रम राबवले जातात. वाचनालयाच्या वेबसाईटवर घरबसल्या वाचनालयातील पुस्तकांची माहिती सभासदांना होते शिवाय घरी बसून पुस्तके वाचता येतात.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर
मुंबईत 44शाखा या ग्रंथालयाद्वारे चालवल्या जातात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, लहान मुलांसाठी सानेगुरुजी बालविकास मंदिर, साहित्य विभाग असे fिवभागांनुरूप काम केले जाते. सध्या 1700 सालापासून असलेल्या ग्रंथाचे डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरू आहे जेणेकरून वाचकांना जुनी पुस्तकेही वाचता यावीत.























































