
सामना प्रतिनिधी, नागपूर
अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. आतापर्यंत आम्ही संयम बाळगला होता. कारण आम्ही हिंदू आहोत आणि संयम ही हिंदूंची ओळख आहे. पण आता आमचा संयम संपला आहे. या देशातील न्यायालयाला हिंदूंची वेदना आपली प्राथमिकता वाटत नसेल तर सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून अयोध्येत राममंदिर उभारावे, अशी आग्रही मागणी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरातील विशाल ‘हुंकार रॅली’त बोलताना केली.
न्यायाला विलंब म्हणजे अन्यायच!
आज या देशात सत्य आणि न्यायाला टाळले जात आहे, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, आधीच्या सरकारने सुरुवातीच्या काळात जर उत्खनन केल्यावर खाली मंदिराचे अवशेष सापडले तर आम्ही तेथे मंदिर होते हे मान्य करून मंदिर बांधू, असे मान्य केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परीक्षणात आणि पुरातत्त्व विभागाच्या परीक्षणात तिथे मंदिर असल्याचे पुरावे सापडले आहेत. मग हे वास्तव टाळले जाऊ नये. जर हे सत्य आणि या सत्यामुळे मिळणारा न्याय या देशात टाळला जाणार असेल तर देशभरातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ हे वाक्य शिकवणे बंद करण्याचे निर्देश द्या, असा खोचक टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
…तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवा – शंकराचार्य
देशातील मोदी सरकारने राम मंदिरासाठी जर बहुमत नसेल तर दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावून राम मंदिराचे विधेयक पारित करून घ्यावे, असे आवाहन ज्योतीर्मठ पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी या वेळी आपल्या भाषणात केले.
या वेळी व्यासपीठावर ज्योतीर्मठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष ऍड. आलोक कुमार यांच्यासह संत मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
summary- mohan bhagwat demands ram mandir to be built quickly





























































