
शारदीय नवरात्र उत्सव काळात नगरसह राज्यभरातील लाखो भाविकांनी मोहटा देवीचे दर्शन घेतले होते. या वेळी भक्तांनी देवीच्या झोळीत भरभरून दान दिले. या काळात एक कोटी 65 लाख रुपयांचे एकूण दान दानपेटीत जमा झाले आहे.
15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर असे 13 दिवस शारदीय नवरात्र उत्सव मोहटा देवी गडावर साजरा करण्यात आला. या काळात राज्यासह परराज्यातील भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. सुरुवातीच्या पाच ते सहा दिवस दरवर्षीच्या तुलनेत कमी गर्दी होती, मात्र त्यानंतर मोठय़ा संख्येने आलेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेत देवस्थानच्या दानपेटीत एक कोटी 65 लाख रुपयांचे दान टाकले. यामध्ये एक कोटी एक लाख दोन हजार रुपयांची रोकड, 16 लाख 31 हजार रुपये किमतीचे 267 ग्रॅम सोने, 6 लाख 84 हजार 600 रुपयांची 9 किलो 125 ग्राम चांदी, 33 लाख 76 हजार 760 रुपयांची पावत्यांद्वारे रोकड, पाच लाख 12 हजार 400 रुपये ऑनलाइनद्वारे, तर कावड व पालखीच्या वेळेस 2 लाख 20 हजार 625 रुपये असे मिळून एकूण एक कोटी 65 लाख रुपयांची देणगी भाविकांनी देवीच्या दानपेटीत टाकली आहे.
सर्व दानपेटय़ांमधील रकमेची मोजणी ही नगर येथील धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी उमाकांत फड, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे तसेच पाथर्डी येथील राजेंद्र शेवाळे, देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी, पाथर्डीचे पोलीस पथक उपस्थित होते. दोन दिवस सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या निगराणीत ही मोजदाद करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, विशस्त, भाविक, मोहटे ग्रामस्थ, देवस्थानचे कर्मचारी व विविध सामाजिक संस्थांनी मोठे कष्ट घेतल्याने ही यात्रा शांततेत पार पडली असून, या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
– सुनील गोसावी,
जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोहटा देवस्थानचे अध्यक्ष




























































