Monsoon ची प्रतिक्षा संपली! पाच दिवस उशिराने मान्सून गोव्यात आणि दक्षिण कोकणात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला मॉन्सून केरळमध्ये तीन दिवस अगोदर दाखल झाला होता. मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत सुरू असताना निर्माण झालेल्या विरोधी चक्रीय स्थितीमुळे तब्बल 10 दिवस मान्सून कारवारमध्ये रेंगाळला होता. आता मान्सूनसाठीची पोषक वातावरण निर्माण झाल्याने आज मान्सून गोव्यात आणि दक्षिण कोकणात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेने दिली आहे. पुढील 4 दिवस मूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले, मॉन्सूनसाठीची पोषक स्थिती अरबी समुद्रात तयार झाली असून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रावरून येणारी आर्द्रता, वाढलेली ढगांची घनता लक्षात घेता मान्सून सक्रिय झाला आहे. गोव्याची राजधानी पणजीसह डिचोली, सत्तरी, वाळपई, सांगे, काणकोण तालुक्यांतील अनेक गावांत मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच महाराष्ट्रातील दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. रायगडमधील माणगाव, महाड, गोरेगाव भागात पाऊसाने जोरदार बॅटींग केली. कोकणातील काही भागात तुरळक पाऊस पडला.

दक्षिण-पश्‍चिम मान्सूनने केरळ आणि कर्नाटकात वेळेआधी हजेरी लावली असली, तरी पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती नसल्याने दक्षिणात्य भागांमध्ये तो10 दिवस रेंगाळला होता. मात्र, पूर्वोत्तर राज्यातील त्याची वाटचाल सुरूच होती. बंगालच्या उपसागराचा मध्य भाग पूर्वोत्तर राज्ये सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. आता नैऋत्य भागातून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने मान्सूनने पश्‍चिम आणि मध्य हिंदुस्थानकडे वाटचाल सुरू केल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

राजधानी पणजीसह राज्याच्या अनेक भागांत गुरुवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री सर्व व्यवहार संपत आले असता पावसाने सुरुवात केल्याने जनजीवनावर तितका परिणाम जाणवला नाही. मात्र, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले.