
दोन दिवस रेंगाळलेल्या मान्सूनच्या सरींनी मंगळवारपासून बरसण्यास सुरूवात केली आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे मिरगाच्या दिवशी कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. हवामान खात्याने पुढील चार दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आता मान्सूनने बरसण्यास सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रिवादळानंतर गेले 15 ते 20 दिवस तालुक्यात अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, मृग नक्षत्रापासून पावसाळी हंगामाला सुरूवात होते. मंगळवारी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात मान्सूनच्या सरीवर सरी बरसल्या. पावसाळ्याला सुरूवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यापासून ठिकठिकाणी भातपेरणीसह जमीनीची मशागत करण्याची कामे जोरात सुरू आहेत. त्यातच आता मान्सून सुरू झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. तसेच या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
































































