राज्यात आचारसंहिता कालावधीत 4 हजार 428 गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणांत 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 131 प्रकरणांत परवाना असलेली शस्त्र कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परवाना नसलेली 328 शस्त्र, 81 काडतुसे आणि 8 हजार 302 जिलेटीन आदी स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 797 शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. 131 प्रकरणांत परवाना असलेली शस्त्र कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत, तर 46 शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 63 हजार 608 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 16 हजार 380 प्रकरणांत अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 6 हजार 228 प्रकरणांत अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 19 हजार 157 प्रकरणांत अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आले असून 21 हजार 264 प्रकरणांत ही कार्यवाही सुरू आहे.