हिंदूंना शत्रू कोण आणि चांगलं कोण? हे कळत नाही. जगातील महामूर्ख जमात म्हणजे हिंदू. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे आता इव्हेंट झाले असून, ते हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करीत शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा बरळले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त सांगली शहरासह विविध ठिकाणी शिव प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा दौड काढण्यात येते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ापासून दुर्गा दौडला प्रेरणामंत्र म्हणून प्रारंभ करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला, असे सांगत संभाजी भिडे म्हणाले, ‘‘गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडियाचा खेळ हिंदू समाजाला गांडू बनवत चालला आहे. हे सर्व चालणार नाही. नवरात्रीचा बट्टय़ाबोळ आम्ही होऊ देणार नाही. काही माता-भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. नवरात्र उत्सवात आयोजित केले जाणारे कार्यक्रम केवळ करमणूक असून, यात धार्मिकता अजिबात नाही. सध्या सुरू आहे हे सर्व संस्कृती नाश करत चालले आहे.’’
आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले. ते आता पाठलाग करत आहेत. आपण पाय लावून पळत आहोत. ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई भाई, हिंदूंना शत्रू कोण? वैरी, वाईट कोण? चांगलं कोण? हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत, असे वक्तव्यही भिडे यांनी केले.